क्षयरोग निर्मूलनासाठी नवीन निदान पद्धती, लस आणि औषधांच्या विकासाला गती देणे आणि इतर नवसंशोधनांचा वापर करण्याची गरज – राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार


नवी दिल्ली, २६ऑक्टोबर /प्रतिनिधी :- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज क्षयरोग निर्मूलन संबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया प्रांताच्या उच्चस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी  वस्तुस्थितीवर  भर देत सांगितले की दक्षिण-पूर्व आशियातील  सर्व सहा प्रांतांमध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक प्रमाण आहे.  “अनेक शतकांपासून हे  मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे आणि आता एचआयव्ही/एड्स आणि मलेरिया सारख्या  संसर्गजन्य रोगांमुळे जगात मृत्यूचे प्रमाण वाढले  आहे. यापैकी बहुतेक मृत्यू तरुणांमध्ये होतात, ज्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होतात. एकट्या  क्षयरोगाचा आर्थिक भार आयुष्य , पैसा आणि कामाचे वाया गेलेले दिवस याबाबतीत  खूप मोठा आहे ” असे त्या म्हणाल्या.

क्षयरोगावर कोविड-19 चा प्रभाव अधोरेखित करताना त्या म्हणाल्या, “केवळ काही महिन्यांत, या महामारीने  क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेल्या  प्रगतीवर पाणी फिरवले  आहे.” त्या म्हणाल्या  की महामारीने आपल्याला अनेक बाबतीत धडे दिले असून क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये त्यांची  मदत होईल.

उत्साहवर्धक राजकीय वचनबद्धतेमुळे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांसाठी  देशांतर्गत संसाधन वाटपात वाढ झाली असून विशेषत: भारत आणि इंडोनेशियामध्ये,  2020 मध्ये  एकूण खर्चाच्या  43% देशांतर्गत स्त्रोतांमधून आले  असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली की, लक्षणीय प्रगती असूनही, संपूर्ण प्रांताने  क्षयरोग उच्चाटन धोरणाची  2020 ची संधी गमावली आहे  आणि तत्काळ उपाययोजना न केल्यास 2022 चे लक्ष्य देखील चुकू शकते.

“2023 मध्ये पुढील संयुक्त राष्ट्र  उच्च-स्तरीय बैठक होणार असून  प्रगतीचा आढावा घेण्याची आणि त्यानुसार आपल्या  पुनर्रचना करण्याची तातडीची गरज त्यांनी व्यक्त केली.  क्षयरोग निर्मूलनासाठी नवीन  निदान पद्धती,  लस आणि औषधांच्या विकासाला गती देणे , डिजिटल तंत्रज्ञान , कृत्रिम बुद्धिमत्ता आणि   इतर नवसंशोधनांचा वापर करण्याची गरज आहे ” असे त्या म्हणाल्या.

भाषण संपवताना त्यांनी  राजकीय बांधिलकी आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी  एकत्र येण्याचे आणि क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला जागतिक आरोग्य संघटनेचे  महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम घेब्रेयसस,जागतिक आरोग्य संघटना  दक्षिण पूर्व आशिया प्रांताच्या

 संचालक डॉ. सुमन रिजाल, प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग हे देखील उपस्थित होते.