घाटीतील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पीएम केअर्स फंडातून उभारण्यात आलेल्या पी.एस.ए. (Pressure Swing Adsorption Plants) ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री श्री.देसाई यांनी पीएसए (PSA) प्लांटची क्षमता सुरक्षितता, वापरासंदर्भात सविस्तर माहिती घेत संभाव्य कोरोना लाटेकरीता सज्ज राहण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

पीएसए (Pressure Swing Adsorption Plants) हे पूर्ण स्वयंचलित वैद्यकीय ऑक्सिजन जनरेटर प्लांट आहे. हे ऑक्सिजन प्लांट म्हणजे क्रांती आहे. दोन ऑक्सिजन प्लांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बसविण्यात आले असून प्रत्येकी प्लांटमध्ये दररोज 1 हजार एलपीएम (LMP) वायू ऑक्सिजन, तर 205 जम्बो ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता या प्लांटमध्ये आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, घाटीच्या अधिष्ठाता वर्षा रोटे-कागिनाळकर, उपअधिष्ठाता डॉ.शिराज बेग, वैद्यकीय अधीक्षक डॉ.काशिनाथ चौधरी, श्रीनिवास गडप्पा, ऑक्सिजन नोडल ऑफिसर डॉ.गायत्री तडळकर आदींची यावेळी उपस्थिती होती.