गावागावात पाणंद रस्ते कृती आराखडा बनविण्याचे आदेश- आमदार प्रशांत बंब यांची आमसभेत माहिती

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खुलताबाद तालुक्यातील २२ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

खुलताबाद ,१८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-ग्रामीण भागामध्ये पाणंद रस्ते  करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील गावागावात पाणंद रस्ते करण्यात येणार असल्याची  घोषणा आमदार प्रशांत बंब यांनी केली.  ते खुलताबाद पंचायत समितीच्या आमसभेत बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार बंब म्हणाले की, ग्रामीण भागातील पाणंद रस्ते  करण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न असून पाणंद रस्ते करण्यासाठी खासगी अभियंते नेमलेले आहेत. जास्तीत जास्त पाणंद रस्ते करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंचायत समितीची आमसभा तहसील कार्यालयासमोर यशोदा लॉन्स येथे आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल जी गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, हिंदवी खंडागळे, पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, उपसभापती युवराज ठेंगडे, सदस्य प्रभाकर शिंदे, अर्चना अंभोरे, रेखा चव्हाण, हिना मणियार,  उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ,  भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहाद्दूर , गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी , भीमराव खंडागळे, संदीप निकम, अमोल गवळी , सतीश दांडेकर आदी  उपस्थित होते. गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी प्रास्ताविकात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा सादर केला.

आमदार बंब यांनी सर्वप्रथम अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती देतांना सांगितले की, तालुक्याचे सरासरी एकूण पर्जन्यमान ८००  मिलिमीटर असून यावर्षी १७० टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील २२ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन  पिकांचे शंभर टक्के  नुकसान झाले आहे.  बाजरी पिकाचा पीक कापणी प्रयोग केला. बाजरी पिकांमध्ये नव्वद टक्के दाणे भरलेले नव्हते. पावसामुळे ७७ घरांची पडझड झालेली आहे. तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून निधी उपलब्ध होताच आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कारवाई केली जात आहे.

—————————————————

सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे आवाहन

डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषी सहाय्यक यांनी नेमणुकीच्या ठिकाणीच मुक्कामी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा शासन निर्णय असतानाही मुलांचे शिक्षण वा तत्सम कारणे दाखवून तालुका, जिल्हास्तरावर अनेक शासकीय सेवक राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा याबाबत  आमदार प्रशांत बंब यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे आवाहन केले आहे.

—————————————————————

तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहाद्दूर यांनी तालुक्यात १५०० हेक्टर ऊस , २७०० हेक्टर अद्रक, भाजीपाला, फळपिके बागायत पिके असून जिरायती पिकांचे शंभर  टक्के नुकसान झाले असून ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते असे सांगितले. शेतकरी संतोष लाटे यांनी सांगितले की, सोनखेडा येथे ऊसाचे नुकसान झाले आहे. गंधेश्वर,  लामनगाव येथेही अद्रक पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगताच आमदार बंब यांनी तालुक्यातील बागायती क्षेत्रातील झालेले नुकसानीचा आढावा घेतला. जिरायती क्षेत्रांत शंभर टक्के नुकसान झालेले असले तरीही बागायती क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे आमसभेत निदर्शनास आले. प्रत्येक बागायती क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश आमदार प्रशांत बंब यांनी तहसीलदारांना दिले. आमसभेत महावितरणच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्ज मंजूर प्रकरणी बँकांच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागतात. अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन बँकांवर कारवाई प्रस्तावित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी एच बी कहाटे यांनी केले.  करोनामुळे दिड वर्षांनंतर झालेल्या या आमसभेस तालुक्यातील सरपंच,चेअरमन,लोकप्रतिनिधी,शेतकरी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.