रोटेगांव जवळ काकीनाडा- साईनगर एक्सप्रेस मधून पाय घसरून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

वैजापूर ,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- काकीनाडा- साईनगर एक्सप्रेस मधून अचानक पाय घसरल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला.संतोष भिकचंद शर्मा असे मृत प्रवाशाचे नाव असून, तो गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील रहिवाशी आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रोटेगांव रेल्वे स्टेशनजवळ घडली
लासुर स्टेशन येथील संतोष भिकचंद शर्मा ( वय 42 वर्ष ) हे रविवारी सकाळी काकीनाडा – शिर्डी साईनगर  एक्सप्रेसने  लासुरस्टेशनहून मनमाडकडे जात होते. रोटेगांव रेल्वे स्टेशनवळ अचानक पाय घसरून ते रेल्वे खाली पडले. रेल्वेच्या चाकाखाली आल्याने त्यांचे दोन्ही पाय व एक हात तुटून ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शर्मा यांना उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना शर्मा यांचा मृत्यू झाला.