अतिवृष्टी व नारंगी नदीच्या पुरामुळे वैजापूर शहरात 2 कोटींचे नुकसान

वैजापूर ,९ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर शहर व परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या परिसरात असलेल्या चार पुलांचे नुकसान झाले तर, 58 घरांची पडझड झाली आहे. 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल नगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे सोपविला आहे.अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी दिली.

27 व 28 सप्टेंबर रोजी वैजापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला.मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने शहरालगतचे नारंगी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले. नारंगी धरण तुडुंब भरल्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी नारंगी धरणाचे दोन दरवाजे उघडून त्याद्वारे 160 क्यूसेस पाणी नारंगी नदीच्या पात्रात सोडण्यात आले.त्यानंतर  कोणतेही नियोजन न करता  मध्यरात्री 12 वाजेनंतर धरणाचे पांच गेट उघडण्यात येऊन 10 ते 12 हजार क्यूसेस ने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले त्यामुळे नारंगी नदीला पूर येऊन नदीकाठच्या दत्तवाडी, भिल्लवस्ती, छत्रपती शिवाजी महाराज मंगल  कार्यालय परिसर, इदगाहनगर व नौगजीबाबा दर्गा परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.58 घरांची पडझड  झाली तर चार पुलांचे नुकसान झाले. 69 कुटुंबियांना सुरक्षिस्थळी हलविण्यात आले होते. नगरपालिकेतर्फे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, चार पुलांचे 1 कोटी 80 लाख रुपयांचे तर 58 घरांची पडझड होऊन त्यांचे 20 लाख रुपयांचे असे एकूण 2 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे.