कोरोना मुळे अनाथ बालकांप्रति शासकीय यंत्रणा असंवेदनशील !

बाल हक्क संरक्षण आयोग पूर्व अध्यक्ष प्रवीण घुगे यांचा आरोप

औरंगाबाद, ७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालले असून अशा अनाथ बालकांप्रति शासकीय यंत्रणा असंवेदनशील असल्याचा आरोप केला असून त्यांना शासकीय योजना त्वरित लागू करून त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी बाल हक्क संरक्षण आयोगाचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केली आहे.

प्रवीण घुगे यांच्या नेतृत्वाखाली अनाथ बालके आणि त्यांच्यासोबत त्यांचे आजी आजोबा अशा सर्वांचे शिष्टमंडळ महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांना भेटले. करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकारने जाहीर केलेला पाच लाखाचा निधी त्वरित या मुलांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा, अशा सर्व अनाथ बालकांना बालसंगोपन योजना लागू करण्यात यावी, अशा अनाथ बालकांच्या औषधोपचारासाठी सर्व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये धर्मादाय कोट्यातून उपचार करण्यात यावेत, अशा बालकांचा संभाळ करणाऱ्या आजी-आजोबांना निराधार सहाय्यक योजना लागू करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन या शिष्टमंडळाने विभागीय उपायुक्तांची भेट घेतली. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील माहिती अजून पर्यंत केंद्र सरकारच्या पोर्टल वर भरण्यात न आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

केंद्र सरकारच्या पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोना साथीच्या आजारामुळे ज्या बालकांनी त्यांच्या पालकांना गमावले आहे त्यांना मदत केली जाणार आहे. अशा मुलांना 18 वर्ष वयात मासिक सहाय्य आणि 23 व्या वर्षी पीएम केअरमधून 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. कोविडमुळे आई आणि वडील असा दोघांचाही मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांचे भवितव्य अंधकारमय होऊ नये यासाठी भरीव अर्थसहाय्य देण्याची ही योजना आहे.परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांची अनास्था व दिरंगाई मुळे अनाथ झालेली मुले अजूनही वंचित आहेत.अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारला न पाठवण्यात आल्यामुळे पी एम केअर फंड फ़ॉर चिल्ड्रन ही योजना जिल्ह्यातील या अनाथ बालकांना लागू होण्यात अडचणी येत असल्याचेही दिसून येत आहे. अशा बालकांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळत या सर्व योजना यांना मिळवून देण्यात याव्यात अशी मागणी बाल हक्क संरक्षण आयोगाचे महाराष्ट्राचे पूर्व अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी चे प्रदेश सचिव प्रवीण घुगे यांनी केली.

या शिष्टमंडळा मध्ये अनाथ बालकांसोबत या बालकांचे पालक तसेच बालोन्नती मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. व्यंकटेश कमळू, ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. राम बुधवंत, राजू सानप, शुभम ढाकणे, दिनेश राजहंस, सुखदेव पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.