वैजापूर तालुक्यातील १६४ गावांची खरीप पिकांची पैसेवारी जाहीर , नजर पैसेवारी ४९.७३ पैशांवर

वैजापूर ,६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सन.२०२१-२२ यावर्षाची खरीप हंगामातील पीक परिस्थिती दर्शविणारी नजर पैसेवारी ३० सप्टेंबर २०२१ रोजी प्रशासनाने जाहीर केली असून,तालुक्यातील ६९ खरीप व ९५ रब्बी अशा एकूण १६४ गावांची नजर पैसेवारी ५० पैशापेक्षा खाली आहे.यानंतर सुधारित तसेच अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील पिकांची स्थिती लक्षात येईल.

प्रशासनातर्फे दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी,सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो.या पैसेवारीवरून शासनाचे दुष्काळ,टंचाई व पीककर्ज,शासकीय मदत,शेतीकर्जाचे पुनर्गठन याबाबत धोरण ठरते. वैजापूर तालुक्यात एकूण १६४ गावे असून,त्यापैकी ६९ गांवे खरीप व ९५ गांवे रब्बीची आहेत.एकूण लागवडीखालील क्षेत्र १ लाख ३३ हजार ४४८ हेक्टर आहे.त्यापैकी पेरणी केलेले क्षेत्र १ लाख २७ हजार ५२९ हेक्टर तर पडीक क्षेत्र ५ हजार ९१९ हेक्टर आहे.  शासन परिपत्रकानुसार वैजापूर तालुक्यातील १६४ गावांची सन.२०२१-२२ यावर्षाची खरीप पिकांची हंगामी नजर अंदाज पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.महसूल विभागाने जाहीर केलेल्या नजर पैसेवारीनुसार वैजापूर तालुक्यात सर्वच गावांतील पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे.