खुलताबाद उरूस भरणार का ? प्रशासनाच्या निर्णयाकडे खुलताबादकरांचे लक्ष

खुलताबाद ,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली आहे. करोनाचा प्रादूर्भाव अद्यापही संपलेला नाही. शासनाने  ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरीही यावर्षी  खुलताबाद येथील उरूस भरणार का ? प्रशासनाकडून उरुसाला परवानगी दिली जाते की नाही ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

 प्रशासनाने यावर्षी कोरोना  विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या ७३५ व्या उरुसनिमित पूर्व तयारीची बैठक घेऊन यावर्षी उरूस भरणार की नाही, याबाबत माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे मार्गदर्शन घेऊन पत्रकार परिषदेत दिली  जाणार असल्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सांगितले. 

तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उरूस व्यवस्था समितीची बैठक घेण्यात आली. सालाबादप्रमाणे उरुसाला आवश्यक तयारीचा आढावा घेण्यात आला.  यावर्षी उरूस भरणार की नाही या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे मार्गदर्शन मागविले जाणार आहे.१२ ते १९ ऑक्टोबर या दरम्यान भरणार्‍या ऊरूसासाठी विद्युत रोषणाई, पार्किंग आदी कामांच्या निविदा मागविण्याबाबत चर्चा करण्यात आली. गेले दोन वर्षे कोरोना  विषाणूच्या  प्रादुर्भावामुळे न भरविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार यंदाचा उरूस भरणार की नाही याविषयीचा निर्णय प्रशासनाकडून जाहीर केले  जाणार आहे.


हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या ७३५ व्या उरुसनिमित महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश,  परिसरातील काही राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गेल्या ७३४ वर्षापासून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. या परीसरात व्यापारी प्रचंड प्रमाणात दुकाने थाटतात. जवळपास एक महिना उरूस भरतो. ज्यामध्ये दररोज हजारो भाविक आणि ग्राहक भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. या ठिकाणी लहान मुलांसाठी रहाट पाळणे, मौत का कुवा, विविध खेळ येत असतात. यात्रेच्या पंधरा दिवसात सुमारे दोन ते अडीच लाख नागरिक भेट देतात. ज्याचा खुलताबादच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात साजरा होत असलेल्या या उरूसाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक निविदांसह अन्य कामांबाबत उरूस व्यवस्था समितीच्या वतीने तयारी सुरू झाली आहे. यंदा उरुसाला परवानगी मिळणार आहे की नाही? याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे मार्गदर्शन मागवले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्णयाकडे खुलताबाद वासीयांचे लक्ष लागून आहे. करोना विषाणूचा प्रादूर्भाव अद्यापही संपलेला नाही. करोनाची दुसरी ओसरत असली तरीही करोनाचा धोका संभवतो. खुलताबाद उरूसास  महाराष्ट्र राज्यासह बाहेरच्या राज्यातील मोठ्या संख्येने व्यापारी, भाविक येत असतात. त्यामुळे १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या ७३५ व्या ऊरूसाला परवानगी मिळते की नाकारली जाते. याकडे स्थानिक जनतेसह बाहेरगावच्या व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत कायदा व सुव्यवस्थेचे उल्लघंन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहन  उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले. या बैठकीला सचिव मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजीलत अहेमद, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन, डॉ अमोल चव्हाण,  नगरपरिषद कार्यालय अधीक्षक संभाजी वाघ उपस्थित होते.

ईद-ए-मिलाद आणि खुलताबादचे महत्त्व

इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या १४०० वर्षांपूर्वीचा पवित्र पोशाख ७०० वर्षांपासून खुलताबाद येथील हजरत ख्वाजा सय्यद जैनोद्दीन शिराजी दर्गामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी हा सण व हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खुलताबाद येथे चांगल्या अवस्थेत जतन करून ठेवलेला हजरत मोहम्मद पैगंबर यांना अल्लाहने शब-ए-मेहराजच्या रात्री भेट दिलेला पवित्र पोशाख चांदीच्या पेटीतून बाहेर काढून मखमली आच्छादनावर दर्शनासाठी ठेवला जातो. समोर असलेल्या हजरत ख्वाजा बुऱ्हानोद्दीन यांच्या दर्गात मु-ए-मुबारक मिशीचा केस ठेवलेला असतो. यंदा ७ ऑक्टोबरला धार्मिक स्थळे सुरू होणार असल्याने भाविकांना यावर्षी पैहरान ए मुबारक (पवित्र पोशाखाचे) व मु-ए-मुबारक (मिशीच्या केसाचे) दर्शन घेता येणार आहे. खुलताबाद येथे या दर्गा परिसरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो./B