औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ची अधिसूचना लवकरच

सांघिक प्रयत्नांतून निवडणूक प्रक्रीया यशस्वीरित्या राबवावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दि.07 :- आगामी 5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ची अधिसूचना लवकरच जाहीर होईल. त्यादृष्टीने सर्व नोडल अधिकारी आणि संबंधितांनी परस्पर समन्वयाने ही निवडणूक प्रक्रिया सांघिक प्रयत्नांतून यशस्वीरित्या राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 पूर्वतयारी बाबतच्या  नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यावेळी म्हणाले, कोवीड संसर्गजन्य परिस्थितीच्या वातावरणात होत असलेल्या 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक 2020 साठी विशेष खबरदारी घेणे क्रमप्राप्त आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार यशस्वी करण्याच्या दृष्टीने सर्व नियुक्त  नोडल अधिकारी , संबधित यांनी वेळोवेळी आयोगाकडून उपलब्ध करुन देण्यात येणारे निवडणूक कामकाजाबाबतचे लेखन साहीत्य बारकाईने वाचावे. सर्व नियमावलींचे काटेकोर पालन करुन निवडणूक प्रक्रीया याशस्वीपणे सुरळीत आणि शांततापूर्ण पध्दतीने पार पाडण्यासठी सज्ज राहावे. कोवीड प्रादुर्भावाच्या वातावरणात निवडणूक प्रक्रियेतील सर्व कामकाज, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी सर्व प्रक्रियाही कोवीड नियमांचे पालन करत करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यादृष्टीने प्रत्येकाने सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडावी. निर्भय, मुक्त आणि सुरक्षितपणे ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार करण्यात आलेल्या कार्यप्रणालीची माहिती देऊन पार पाडायच्या जबाबदाऱ्यां बाबत सर्व संबंधितांना मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या द्ष्टीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत यावेळी माहिती दिली.

बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, अंजली धानोरकर, संगिता सानप, अप्पासाहेब शिंदे,  संगिता चव्हाण, मंदार वैद्य,  नोंदणी उप महानिरिक्षक सोहम वायाळ, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, शहर अभियंता एस बी पानझडे, उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी एमआयडिसी राजेश  जोशी , तहसिलदार तेजस्वीनी जाधव,  यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.