उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापुर धरणाचे दोन दरवाजे उघडले

पैनगंगा नदीपात्रात 1374 क्युसेस पाण्याचा होणार विसर्ग

नांदेड,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापुर धरण) धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे व पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे आज 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 वा. पाणी पातळी 440.85 मीटर इतकी झाली. धरणात सध्या 449.75 दलघमी पाणीसाठा झाला असून धरण 98.51 टक्के भरले आहे.

या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जयपूर बंधाऱ्यामधून 54.66 क्युमेक्स इतका विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे जलाशय पाणीपातळीत वाढ होत आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचे दोन दरवाजे आज 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वा. उघडण्यात आले असून नदीपात्रात 1374 क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेऊन व संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये यादृष्टीने पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरीकांनी आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षीतस्थळी स्थलांतरीत करण्याचे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जाधव यांनी केले आहे.