मला पास करा… विद्यार्थ्याने चक्क उत्तरपत्रिकेत चिकटवल्या पाचशेच्या नोटा

अभ्यास केलेलं परीक्षेत आलंच नाही, मग…

नांदेड : आजकाल अनेक परिक्षांमधून कॉपीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थी काय करतील याचा काही नेम नाही. कुठे विद्यार्थी कॉपी करताना रंगेहाथ पकडले जातात तर कुठे थेट दुसरीच व्यक्ती बनावट प्रमाणपत्र तयार करत विद्यार्थ्याचा पेपर लिहिते. कॉपीचे काही अनोखे फंडे शोधत विद्यार्थ्यांनी प्रशासनालाही आश्चर्यचकित करुन सोडलं आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षेमध्ये तर सर्व हद्दी पार करत विद्यार्थ्याने त्याच्या सात उत्तर पत्रिकांवर प्रत्येकी पाचशेच्या नोटा चिटकवल्या. अभ्यास केलेलं काहीच पेपरात न आल्याने त्याने ही कृती केल्याचं त्याने कबूल केलं आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत चक्क ८५.६६ टक्के विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एकूण २००८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी कॉपी करताना सापडलेल्या १७२० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात मानव्य विद्याशाखेतील ४८८ विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील २७८, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ३३९ आणि आंतरविद्याशाखेतील ६१५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. पाचशेच्या नोटा चिकटवणार्‍या विद्यार्थ्यावर चार परीक्षा न देण्याची बंदी घालण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नांदेड येथील मूल्यांकन केंद्रावर एका विद्यार्थ्याने त्याच्या सातही उत्तरपत्रिकांवर पाचशेच्या नोटा चिटकवल्याची बाब परीक्षकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सीलबंद करून विद्यापीठाकडे पाठवण्यात आल्या. या गैरवर्तणुकीचे प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ अन्वये विद्यापीठाच्या गठित ४८ (५) (अ) समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यावर चार परीक्षा बंदीची कारवाई करण्यात आली. अभ्यास केलेला पण त्यामधील काहीच आलं नाही असं त्या विद्यार्थ्याने समितीपुढे सांगितलं. समितीने या गैरवर्तणुकप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्याचे सर्व विषयांचे गुण रद्द करून त्याला पुढील एकूण चार परीक्षांसाठी बंदी घातली आहे.