आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध क्षेत्रात वाढ करु- पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सेवांमध्ये प्राधान्याने करुन शिक्षण, रोजगार, शेती, आरोग्य, व्यवसाय, उद्योग यासह प्रत्येक क्षेत्रात वाढ करण्यात येईल. या माध्समातून प्रत्येकास चांगल्या संधी देऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय  समारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन झाला.

Image

 याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना देण्यात आली. समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा,  जिल्हा पोलिस अधिक्षक आर. राजा स्वामी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी  निमंत्रित उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी स्वातंत्र्यदिनापासून राज्यात “ई-पीक पाहणी” प्रकल्प राबविण्यात येणार आहे, महाराष्ट्राचा हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरेल.

ते म्हणाले, कोरोना काळात ३९ हजार बांधकाम कामगारांना थेट अर्थ सहाय्याचे डिबीटी तून वितरण, पोकरातून ३१८ गावातील  लाभार्थ्यांना ६१ कोटींचे अनुदान, जिल्हा वर्षिक योजनेतून साडे तीनशे कोटींची तरतूद, विशेष घटक योजनेत 100 कोटीं रुपयांचे विकास योजनांचे नियोजन केले जात आहे. राष्ट्रीय लोकन्यायालयातून तडजोडी प्रकरणातून १५ कोटींचा दिलासा गेला आहे. जिल्ह्यात विविध बाबीतून सकारात्मक काम होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या आर्थिक उन्नतीचे, त्यांचे जीवनमान उंचावण्याचे स्वप्न मी पाहिले आहे. त्यांच्या उन्नतीच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर करून जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष भरून काढू असा विश्वास मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागाने उपाय योजना केल्या जात आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यादृष्टीने तयारी करत आहोत. ऑक्सिजन बाबत स्वावलंबी व्हावा यासाठी 11 तालुक्यात 11 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असून यापैकी 4 प्लांटचे काम अंतिम टप्प्यात आहे असे त्यांनी सांगितले.

Image

यावेळी उपस्थित मान्यवर व नागरीक यांची भेट घेऊन पालक मंत्री श्री मुंडे यांनी सदिच्छा दिल्या त्यांच्या हस्ते बीड जिल्ह्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुर्यकांत तुकाराम गुळभिले यांचा राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाल्याने सत्कार करण्यात आला.  तसेच कोरोना काळातील कार्याबद्दल स्वाराती वैद्यकिय महाविद्यालयाच्या वतीने डॉ नितीन चाटे यांनी  सन्मान स्व‍िकारला यासह स्व.केशरताई सोनाजीराव  क्षीरसागर आणि कृष्णा रुग्णालय कामाचा प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान  करण्यात आला. 

Image

वृत्तपत्र भूसंपादन जाहिरातींची थकित देयके देण्यासाठी कार्यवाहीसाठी प्रशासनाला सूचना

ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये वृत्तपत्र भूसंपादन जाहिरातींची थकित देयके मिळण्यासाठी जिल्ह्यातील दैनिकांचे संपादक आणि पत्रकार यांनी पालकमंत्री यांना निवेदन केले. सदर देयके अदा होण्यासाठी संबंधित अधिकारी यांना कार्यवाही करण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत बैठक घेऊन  हा प्रश्न  सोडवण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले. यानंतर त्यांनी विविध आंदोलकांची आंदोलन स्थळी भेट  घेतली व त्यांचे म्हणणे समजावून घेतले.