रानभाज्या जतन व संवर्धनासाठी कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावेत-पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- मानवी शरिरास उपयुक्त व पोषक अशा नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्यांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे. या रानभाज्या कायम उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठाने संशोधन करावे. संशोधनासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल, जेणेकरुन रानभाज्यांचे जतन व संवर्धन होईल असे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले. पैठण रोड येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित रानभाजी महोत्सवात ते बोलत होते.

Displaying 2.jpg

कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद तसेच गांधेली येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाठ, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, विभागीय कृषी सहसंचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एल.जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक किशोर झाडे, काकासाहेब सुखासे, संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच रानभाज्या विक्रीसाठी आलेले शेतकरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रानभाज्यांविषयीच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच कृषी विभागातील विविध उपक्रमात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कृषी सहायक, कृषी अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Displaying 4.jpg

पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले, ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या भाज्या, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या भाज्या वर्षभर उपलब्ध होतील यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन करावे. रानभाज्यांचे मागणीनुसार विपणन करणे काळाची गरज असून यासाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. स्थानिक  लोकप्रतिनिधींनीही आपल्या विभागात आरोग्यास हितकारक अशा या रानभाज्यांचे विक्री केंद्र सुरू करावेत. रानभाजी महोत्सवाचे आयोजन काही दिवसांपुरते न करता हा महोत्सव वर्षभर साजरा करावा जेणेकरुन रानभाज्यांचे जतन व संवर्धन होईल. असेही पालकमंत्री म्हणाले.

कृषी सहसंचालक श्री.डी.एल.जाधव यांनी प्रास्ताविकात रानभाजी महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आदिवासी दिनानिमित्त 09 ते 15 ऑगस्ट या कालावधीत रानभाजी महोत्सवाचे आयोजन गेल्यावर्षीपासून पासून करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये करटोली, घोळ, आंबुशी कुर्डु, केना, सुरण, दिंडा, कुडा, टाकळा, पाथ्री, भुईआवळी, कपाळफोडी, तरोटा, आगडा, उंबर, चिगुर, सराटे, मयाळू अशा विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत असेही ते म्हणाले.  

Displaying 1.jpg

सातारा परिसरातील रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा परिसरातील महानगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 114 मधील संग्रामनगर, हायकोर्ट कॉलनी येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांची उपस्थिती होती. उद्घाटनाच्या या कार्यक्रमात कोरोना विषयक नियमांचे पालन करण्यात आले.