संतपीठात पाच परिचय अभ्यास प्रमाणपत्र कोर्सची होणार सुरुवात

संतपीठाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते मुक्तीसंग्राम दिनी लोकार्पण – रोहयो मंत्री संदीपान भूमरे

औरंगाबाद,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पैठण येथील संतपीठाचे लोकार्पण आणि अभ्यासक्रमांची सुरुवात हैदराबाद  मुक्ती संग्राम दिनापासून होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते संतपीठाचे लोकार्पण होईल, असे रोहयो मंत्री संदीपान भूमरे म्हणाले.

रोहयो मंत्री भूमरे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पैठण येथील संतपीठ प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.सध्या सुरू असलेल्या विविध कामांची, इमारतीत असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी करत अधिकारी यांनी सूचविलेल्या अडचणी समजून घेतल्या.त्या तत्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देशही दिले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ.ज्योती सूर्यवंशी, समन्वयक प्रवीण वक्ते उपस्थित होते.

लोकार्पणानंतर संतपीठ येथे सुरुवातीला संत साहित्य, तत्वज्ञानावर आधारित पाच परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितले. या संतपीठाच्या माध्यमातून मुल्याधारीत लोकशिक्षणास चालना मिळेल. पैठण येथील उद्योग आणि रोजगार क्षेत्रासही लाभ होईल, असेही ते म्हणाले.