परपुरुषासाेबत राहणाऱ्या महिलेला पतीकडून पाेटगी देण्याचा निर्णय रद्द

पुरावे पाहून फेर निर्णय घेण्याचे काेपरगाव न्यायालयाला खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- परपुरुषासाेबत पत्नी वैवाहिकतेसारखे जीवन जगत असल्याची पुराव्यासह केलेल्या मांडणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी याप्रकरणी काेपरगाव न्यायालयाने दिलेला अंतरिम पाेटगीचा निर्णय रद्द केला. पुरावे पाहून फेरनिर्णय घ्यावा, असे आदेशही खंडपीठाने काेपरगाव न्यायालयाला दिले आहेत.

या प्रकरणातील पती, पत्नी हे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यांचे लग्न २००२ मध्ये झाले. दाेन अपत्यही त्यांना आहेत. मात्र, २०१४ पासून दाेघेही विभक्त राहतात. त्यांची मुले ही पतीकडे राहतात. पती हा समाजातील प्रतिष्ठित क्षेत्रात कार्यरत असून, पत्नी ही एका पुरुषासाेबत वैवाहिकतेसारखे जीवन जगत आहे. असे असतानाही पत्नीने काेपरगाव न्यायालयात अर्ज दाखल करून पतीकडून पाेटगी मिळावी, अशी मागणी केली हाेती. त्यावर काेपरगाव न्यायालयाने पत्नीला पाच हजार रुपये महिना पाेटगी देण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाला पतीने खंडपीठात अॅड. नितीन चाैधरी यांच्यामार्फत कलम १२५ (४) नुसार आव्हान दिले. सुनावणीवेळी पतीकडून पत्नीचे परपुरुषासाेबतचे वैवाहिकतेसारखे जीवन जगत असल्याच्या संदर्भाने पुरावे देण्यात आले. पत्नीकडील नजीकच्या नातेवाईकांच्याही तक्रारी मांडण्यात आल्या. १२५ (४) नुसार कुठलीही पत्नी इतर पुरुषासाेबत वैवाहिक जीवन जगत असेल तर तिला पाेटगी मागण्याचा अधिकार नाही व त्याप्रमाणे पुरावेही सादर करण्यात आले आहेत, असा युक्तिवाद अॅड. चाैधरी यांच्याकडून करण्यात आला. सुनावणीनंतर खंडपीठाने अंतरिम मंजूर झालेला पाेटगीचा निर्णय रद्द केला. तसेच पुन्हा पुरावे तपासून निर्णय घ्यावा, असे आदेश केले.