उत्तर पत्रिका बदलल्याप्रकरणी बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर यांची निर्दोष मुक्तता

Image

औरंगाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-अभियांत्रिकेच्‍या दिलेल्या परिक्षेत पुर्नतपासणीत पास होण्‍यासाठी उत्तर पत्रिका बदलल्याप्रकरणी बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर  यांच्‍यावर सप्‍टेंबर २००१ मध्‍ये छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. या खटल्याच्‍या सुनावणीअंती अतिरिक्त मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी आमदार क्षिरसागर यांची सबळ पुराव्‍या अभावी निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील तत्कालीन परिक्षा नियंत्रक डॉ. माधव गुमास्‍ते यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, १२ ते १३ सप्‍टेंबर २००१ दरम्यान विद्यापीठातील बॅडमिंटन  हॉलमध्‍ये ठेवलेल्या अभियांत्रिकेच्‍या उत्तर पत्रिकां गहाळ झाल्या होत्या. १३ सप्‍टेंबर २००१ रोजी सकाळी माधव गुमास्‍ते यांना वॉचमनने माहिती दिली की, बॅडमिंटन हॉलचे कुलूप तोडून अभियांत्रिकेच्या उत्तर पत्रिकांमधून काही उत्तर पत्रिका चोरुन त्या‍ जागी बनावट उत्तर पत्रिका ठेवण्यात आल्या होत्‍या. त्‍यापैकी एक १११०८० क्रमाकांची उत्तर पत्रिका विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर यांची होती. त्‍यामुळे या प्रकरणात २५ सप्‍टेंबर २००१ रोजी आ. क्षिरसागर यांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्‍यात कलम ४६५, ४२०, ४६८, ४५४, ४५७, ३८० आणि ३४ अन्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

छावणी पोलिस ठाण्‍याचे तत्कालीन निरीक्षक एस.बी. शिरसाठ यांनी १२ मे २००३ दोषारोपपत्र दाखल, सुनावणी वेळी ६ साक्षीदारांचे जाबाब नोंदविण्‍यात आले. तर आ. क्षिरसागर यांच्‍या वतीने  के.जी. भोसले यांनी युक्तीवाद करुन बॅडमिंटन  हॉलमध्‍ये महत्वाची कागदपत्र ठेवलेली असल्याने कडेकोट पहारा होता. तेथे कोणी प्रवेश करुन उत्तर पत्रिका बदलू शकत नव्‍हता. वॉचमनचा जबाब घेतला नाही. उत्‍तर पत्रिका कोणी बदलल्या याचा सबळ पुरावा नाही. उत्‍तर पत्रिकेचा नंबर कोणाचा हे परिक्षा‍ नियंत्रका व्‍यतिरिक्त कोणालाही माहिती नसते. उत्‍तरपत्रिका पुर्नरतपासणी हे २५ प्राध्‍यपक सतत काम करीत होते, त्‍यामुळे उत्‍तर पत्रिका बदलल्या की नाही सांगता येणार नसल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले.

सुनावणीअंती न्‍यायालयाने सबळ पुराव्‍या अभावी आ. क्षिरसागर यांनी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात भोसले यांना सुरेखा भोसले , अभयसिंह भोसले , तौसीफ, दिपक पाटील यांनी सहाकार्य केले.