राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगावर आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती

औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगावर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

         महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 च्या कलम (2) (त्र) अन्वये सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेच्या सदस्यांमधून आ.सतीश चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठाने सादर केलेल्या सर्वसमावेशक सम्यक योजनेला मान्यता देणे, शिक्षण देताना, शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करताना, शिक्षणाचे प्रशासन व नियमन आदींमध्ये राष्ट्रीय व जागतिक पातळीवर होत असलेला विकास जाणून घेणे व त्याचा मागोवा घेणे व त्या बदलानुरूप राज्यातील शिक्षण पध्दतीमध्ये यथोचित धोरण व कार्यतंत्र विकसित करणे, राज्यातील तसेच राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक, संशोधन आणि विकास परिसंस्थांमधील विविध ज्ञानस्त्रोत केंद्रांच्या जाळ्याच्या निर्मितीव्दारे माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधनाची व्याप्ती व दर्जा यात वाढ करणारी संशोधन जर्नल्स, संशोधन व तंत्रज्ञान यांच्या आदानप्रदानासाठी वाव देणे आदी कार्य व कर्तव्ये महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची असणार आहे.

         महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.