एनएसएस, एनसीसी यापुढेही आदर्श निर्माण करतील-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

कोविड योद्धा पुरस्काराने एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मान
औरंगाबाद,८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-देशभक्ती, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत यापुढेही राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) माध्यमातून समाजासमोर आदर्श निर्माण करण्यात येईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष), उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावतीने शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील कोविड योद्ध्यांना मंत्री सामंत यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान जालना येथील समाजकार्य महाविद्यालयाचे सिद्धेश्वर शेळके आणि औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वेदांत डिके यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमास सर्वश्री आमदार अंबादास दानवे, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, रासेयो सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू, उच्च शिक्षण सहसंचालक रणजित निंबाळकर, प्राचार्य डॉ.एच.आर.सातपुते, जिल्हा समन्वयक डॉ.सोमिनाथ खाडे उपस्थित होते.


मंत्री सामंत म्हणाले, मागील दीड वर्षात कोरोना काळात एनएसएसच्या स्वयंसेवकांनी भरीव असे आदर्श कार्य केले. राज्यभरात पूर्वी केवळ एकच पुरस्कार एनएसएसच्या विद्यार्थ्यांना दिला जात. मात्र, आता शासनाकडून जिल्हा, विद्यापीठस्तरावर पुरस्कार देण्यात येत आहेत. महसूल, आरोग्य आणि पोलीस आदी विभागाच्या खांद्याला खांदा लावून एनएसएसच्या स्वयंसेवकांनी कोरोना कालावधीतही महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या कार्यातून शासन, प्रशासनास मोठ्याप्रमाणात मदत झाली आहे. यापुढे महाविद्यालयात एनएसएस, एनसीसीचे उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी ओळखत देशसेवेच्या कार्यात अधिकाध‍िक योगदान द्यावे, असेही मंत्री सामंत म्हणाले.


आमदार दानवे यांनीही पुरस्कार देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. विजेत्यांसह सर्व एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉ.येवले, डॉ.प्रभू यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे संचालक डॉ. टी.आर.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.खाडे यांनी केले. आभार डॉ.सातपुते यांनी मानले.
महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
मंत्री सामंत यांच्याहस्ते मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा समारोप झाला.