नगर -बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम गतीने पूर्ण करा – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रेल्वे राज्य मंत्री दानवे यांच्याकडे मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गालगत समांतर बुलेट ट्रेनचा सर्वे करा

औरंगाबाद,२९ऑगस्ट /प्रतिनिधी :- मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे ३० किमीचे काम पूर्ण करा.  ३० किमीचे काम प्रगतीपथावर असून या मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी तातडीने चाचणी घेण्यात यावी,  उर्वरीत बीड ते परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गालगत समांतर बुलेट ट्रेनचा सर्वे करा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली.

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी मार्ग सुरू होत आहे. या मार्गाच्या समांतर मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. देशात नवीन बुलेट ट्रेनसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्या नवीन मार्गामध्ये या मार्गाचा समावेश करण्यात यावा. या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा व विदर्भाचे दळणवळण सुधारेल. औरंगाबाद व नागपूर या शहरातील व्यापार व उद्योग वाढीसाठी मोठा फायदा होऊ शकेल. या नवीन रेल्वे मार्गाची योग्यता तपासून सर्वेक्षण करण्यात यावे अशी विनंती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे केली आहे. यावेळी साई शेलार, योगेश मिसाळ आदींसह नागरिक उपस्थित होते.