कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिम: 58 कोटींहून अधिक व्यक्तींना लसीच्या मात्रा

गेल्या 24 तासांत 52 लाख लसींच्या मात्रा 

गेल्या 24 तासांत 30,948 नव्या कोरोना बाधितांची नोंद

देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या (3,53,398) असून, गेल्या 152 दिवसांतील सर्वात नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली, २२ऑगस्ट /प्रतिनिधी :-

भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 58 कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला.देशात गेल्या 24 तासांत लसीच्या 52,23,612 मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने (58,14,89,377) काल 58 कोटी 14 लाखांचा टप्पा पार केला. 64,39,411 लसीकरण सत्रांच्या आयोजनातून हे साध्य करण्यात आले.

देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढवणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 38,487 रुग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,16,36,469 झाली आहे.

परिणामी, भारताचा रोगमुक्ती दर सध्या 97.57% असून हा मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग 56 दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या 24 तासांत, भारतात 30,948 नव्या कोविडग्रस्त रुग्णांची नोंद झाली.कोविडमुक्त होणाऱ्यांची वाढत जाणारी संख्या आणि नव्याने बाधित होणाऱ्यांची कमी झालेली संख्या यांच्यामुळे देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 3,53,398 झाली आहे, जी गेल्या 152 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या देशातील एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.09% म्हणजेच मार्च 2020 पासूनच्या सर्वात नीचांकी पातळीवर आहे.

देशात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार सुरु असून गेल्या 24 तासांत एकूण 15,85,681 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 62  लाख (50,62,56,239) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार करत असताना, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2 % आहे, हा दर गेले 58 दिवस 3% हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील आज 1.95% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आता गेले 27 दिवस 3% हून कमी आणि सलग 76 दिवस 5% हून कमी राहिला आहे.