लसीकरणासह कोविड चाचण्या वाढवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद ,४ जुलै  /प्रतिनिधी :-कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून संक्रमणाला अटकाव होतो. लसीकरणासह जिल्ह्यात कोविड चाचण्या करण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

May be an image of 9 people, people sitting, people standing, office and indoor

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडच्या अनुषंगाने जिल्हा टास्क फोर्सची बैठक पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोतिपवळे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, श्रीमती संगीता सानप, श्रीमती संगीता चव्हाण आदी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील बाह्यरुग्ण (OPD) विभाग , आंतररुग्ण (IPD)  विभागात भरती होणाऱ्या रूग्णांपैकी निवडक रुग्णांची RTPCR चाचणी करावी. ही चाचणी संबंधित डॉक्टरांच्या सल्यानुसार करण्यात यावी. तसेच ज्या भागात लसीकरण कमी झालेले आहे त्या भागातील लसीकरण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

          यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, घाटी तसेच महा पालिकेच्या आरोग्य  यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला.