कारगिल विजय दिनानिमित्त केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद वीरांना वाहिली आदरांजली

  • संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना वाहिली आदरांजली
  • कृतज्ञ राष्ट्र नेहमीच या वीरांच्या साहसी कार्याच्या ऋणात राहील
  • संरक्षण राज्यमंत्री, सेना दलांचे आणि हवाई दलाचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि CISC यांनी देखील शहिदांना आदरांजली वाहिली
Image

नवी दिल्ली,२६जुलै /प्रतिनिधी :-कारगिल विजय दिवसाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 26 जुलै 2021 ला  नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण केली. कारगिल संघर्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या 1999 मधील ऑपरेशन विजय मोहिमेदरम्यान भारताला विजय प्राप्त करून देताना देशसेवेसाठी प्राण अर्पण केलेल्या या शूरवीरांच्या सन्मानार्थ संरक्षणमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

Image

राष्ट्रीय युद्ध स्मारकातील अभ्यागतांच्या नोंदवहीत लिहिलेल्या संदेशात राजनाथ सिंग यांनी कारगिल संघर्षात सहभागी झालेल्या साहसी वीरांच्या शौर्याचे स्मरण केले. भारतीय सेना दलांच्या धाडसी वीरांनी केलेल्या त्यागाला देश कधीच विसरणार नाही असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.

आपल्या ट्वीट संदेशात संरक्षणमंत्री म्हणतात की शूर सैनिकांनी केलेले सर्वोच्च त्याग येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहतील.

संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट, हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे, संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार यांनी देखील या प्रसंगी राष्ट्रीय युध्द स्मारक येथे शहिदांना आदरांजली वाहिली. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रशासनिक आणि लष्करी अधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होते.

कारगिल संघर्षादरम्यान भारतीय लष्कराच्या धाडसी जवानांनी, भारतीय हवाई दलाच्या मदतीने, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, शत्रूच्या मुलुखात, असह्य हवामानाशी झुंज दिली आणि शत्रूने ताब्यात घेतलेल्या अतिउंचीवरील प्रदेश पुन्हा जिंकून घेतला. या अविस्मरणीय प्रसंगी, संपूर्ण राष्ट्र विविध ठिकाणी शूर शहिदांचे स्मरण करत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या देशाचा विजय साजरा करीत आहेत.