आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात : क्रीडामंत्री सुनील केदार

नवी दिल्ली,७जुलै /प्रतिनिधी :- पुण्यातील बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज दिली.

राज्याचे क्रीडा मंत्री यांनी आज विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रो.डी.पी.सिंग यांची भेट घेतली. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाशी निगडीत महत्त्वाच्या विषयांसंदर्भात चर्चा झाली असल्याचे श्री.केदार यांनी बैठकीनंतर सांगितले.

आज झालेल्या बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांतर्गत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला अधिकृत मान्यता देण्यात यावी, विद्यापीठात शिकविण्यात येणाऱ्या विषयांची वैधानिक परिभाषा काय असणार आहे, यासह या विद्यापीठाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले. या विषयांशी निगडीत परवानग्या मिळण्यासाठी कुलगुरूंची समिती अभ्यास करून निर्णय घेणार आहे. यासाठी एका महिन्याचा कालावधी लागणार असल्याचेही श्री.केदार यांनी सांगितले.

या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम आणि संचार, क्रीडा प्रशिक्षण हे विषय शिकविले जातील त्यामुळे या विषयांमध्ये शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होतील. भविष्यात राज्यातील पांरपारिक क्रीडा प्रकारही शिकविले जातील, अशीही माहिती श्री केदार यांनी दिली.