छावणीतील बहुचर्चित शेरखान खून खटल्यातील सह आरोपींना सशर्त  जामीन

औरंगाबाद,१३ जून /प्रतिनिधी:- छावणीतील बहुचर्चित अक्रम  खान उर्फ शेरखान खून खटल्यातील सह आरोपी शेख सिराज उर्फ अज्जी दादा शेख नसीर, शेख बशीर  उर्फ मुन्ना बोचरा  शेख करीम  आणि शेख अश्फाक  शेख इशाक या तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर सशर्त जामिनावर मुक्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी यांनी  दिला आहे. 

जमिनीच्या वादातून झाला होता खून         

जमिनीच्या वादातून २८ डिसेंबर २०१९ च्या रात्री छावणी परिसरात होलीक्रॉस  मराठी शाळेजवळ अक्रम खान उर्फ शेरखान याचा खून झाला होता. याबाबत शेरखानच्या मुलाने ५ जणांविरुद्ध तक्रार दिली होती. तपासाअंती गुन्ह्यामधील चौघांविरुद्ध  पुरावा नसल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला होता. आरोपी क्र. एक मुजतबा रफीक उर्फ मुस्तफा उर्फ  अक्रम पहलवान शेख अब्दुल वहाब याला जामिनावर सोडलेले आहे.  त्यानंतर पोलिसांनी इतर ७ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते .        

अर्जदार आरोपींनी अभयसिंह भोसले, सतेज जाधव व एम ए लतिफ यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. खंडपीठाचे निरीक्षण सुनावणी अंती खंडपीठाने असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी अर्जदार बराच काळ तुरूंगात आहेत. आरोपपत्र दाखल केले गेले आहे आणि म्हणूनच तपासाच्या उद्देशाने त्यांची पुढील कोठडीची आवश्यकता नाही. त्यांच्याविरूद्ध जे पुरावे गोळा केले गेले आहेत ते आता पाहण्याची गरज आहे. खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे हे फिर्यादी देखील स्वीकारत आहेत. घटनेत  प्रत्येक अर्जदारांची भूमिका खूप अल्प आहे.  देशभरातील कोरोना परिस्थितीचा विचार करता यापुढे आरोपींना कोठडीत ठेवणे संयुक्तिक होणार नाही, खटला पूर्ण होण्यास बराच वेळ लागेल. अर्जदारांना कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असे मत नोंदवित खंडपीठाने आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करून आदेश दिला .       

आरोपींच्या वकिलांना  मोहसीन पटेल व रोहीत सोळसे यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे एस बी नरवडे तर फिर्यादीतर्फे  नितीन गवारे यांनी काम पाहिले.