आनंदी जगायचंय? मग एवढंच करा:राग टाळा, व्यर्थ बोलू नका, निंदा तर नकोच-मोटीव्हेशनल स्पीकर शिवानी दीदी यांची त्रिसूत्री

औरंगाबाद,१३ जून /प्रतिनिधी:- कोरोनामुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचे आपण सांगतो, पण त्या आधी काय आनंदी आनंद होता? आपण शारिरीक, मानसिक आरोग्याकडे लक्ष देतो. पण मानसिक स्वास्थ बिघडू नये यासाठी भावनिक स्वास्थ टिकवणे आवश्यक आहे. आपले वर्तन, दुसऱ्यांबाबत विचार, भावविश्व यातून भावनिक स्वास्थ ठरते. ते सुढृढ करून आनंदी जीवन जगण्यासाठी राग आणि निंदा टाळा तर व्यर्थ बोलूच नका, अशी त्रिसूत्री मोटीव्हेशनल स्पीकर बी.के.शिवानी दीदी यांनी दिली.

Displaying IMG-20210613-WA0000.jpg

चेतना एम्पावरमेंट फाऊंडेशन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मानसिक स्वास्था संबंधी प्रबोधन करण्याच्या कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याच्या व्हर्चुअल उद्घाटनाच्या सत्रात बी.के.शिवानी दीदी बोलत होत्या. कोराेनाच्या संकटात आनंदी जगण्यासाठी त्यांनी तीन बाबी सांगीतल्या.
असामान्याला सामान्य समजण्याची चूक

दु:ख, तणाव, राग, भीती, चिंता, इर्ष्या, तक्रार ही असामान्य असण्याची लक्षणे आहेत. आपण त्यांना सामान्य समजतो. त्यांना बदलण्याचा विचारही करत नाही. उलट आनंद, सन्मान, कौतूक या प्रत्येकाच्या जीवनासाठी सामान्य बाबी आहेत. पण अशी लक्षणे असणाऱ्यांना आपण असामान्य समजतो. या बाबी आपले भाविनक स्वास्थ घडवतात. यामुळे आजपासून भावनिक प्रतिकारशक्ती (इमोशनल इम्युनिटी) वाढवण्यासाठी प्रयत्न  करा. आनंदी जीवनासाठी इतरांवर अवलंबून न राहता  आत्मनिर्भर बना. लहानसहान बाबींमध्ये आनंद शोधा.
राग टाळा, क्रोधमुक्त औरंगाबाद करा

राग हा सर्वात मोठा शत्रु आहे. पण घर, समाज आाणि कार्यालयात तो नेहमीच दिसतो. नियम पाळण्यासाठी कडक राहणे आणि रागावणे यात फरक आहे. पण लोकं त्याची सरमिसळ करतात.रागवल्यावर संयम हरवतो, आवाज चढतो, शिवी देतो, हात उगारतो. पण कडक असतो त्यावेळी संयम ढासळत नाही, आवाज चढत नाही, हावभाव, शब्द बिघडत नाहीत. आजपासून राग टाळा. “क्रोधमुक्त औरंगाबाद’ उभारा. याची सुरूवात आपापल्या घरातून करा.
परचिंतन नको, निंदाही कशासाठी

काही लोकं त्यांच्या मनातील कचरा तुमच्या मनात टाकतात.  सगळ्यांचा कचरा जमा करायला तुमचे मन कचराकुंडी नाही. कोणी कोणाबाबत काही सांगत असेल तर ते ऐकू नका. जाे समोर नाही, त्याची निंदा करू नका. कोणाच्या बोलण्यावर वाईट प्रतिक्रिया देवू नका. हे आजपासून सुरू करा. दररोज तासभर कोणाबाबतही त्याच्या वाईट बोलणार नाही, हे ठरवून टाका.
संकटातून संधी

उद्योजक ऋषी बागला म्हणाले, पहिले महायुद्ध व स्पॅनीश फ्लुचे संकट कोरोनापेक्षा मोठे होते. त्यावर मात करत जग इथपर्यंत पोहचले. प्रत्येक संकट संधी घेवून येते. आपल्याला मजबूत करते. पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर म्हणाल्या, कोरोनाच्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी मानसिक आरोग्य चांगलेे ठेवावे लागेल. सर्व  मिळून तिसऱ्या लाटेचा सामना करू. आमदार अंबादास दानवे म्हणाले, कोरोनामुळे लोकांचा आत्मविश्वास ढासळलाय. ताे वाढवण्यासाठी असे कार्यक्रम उपयोगी आहेत. चेतनाचे संयोजक अध्यक्ष विवेक रांदड यांनी प्रस्तावना तर उपाध्यक्ष मिताली लाठी यांनी भूमिका  मांडली.