परभणी:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशात सोमवारपासून अटी व शर्तीवर शिथीलता

जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आदेश

परभणी,६ जून /प्रतिनिधी:- जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 8 टक्के असुन ऑक्सिजन बेडस व्यापलेली टक्केवारी 16 टक्के इतकी आहे. या परिस्थितीचा विचार करून परभणी जिल्ह्याचा शासनाच्या आदेशानुसार तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे.

यासंदर्भात मार्गदर्शक तत्वानुसार सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 वाजेनंतर कोणत्याही प्रकारची हालचाल, संचार करता येणार नाही. तसेच आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी अत्यावश्यक वैद्यकीय कारणांशिवाय कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही. जिल्ह्यात दि.7 जून 2021 रोजीपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे विविध आस्थापना/संस्था यांना अटी व शर्तीवर सूट राहील.

1) अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

2) अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळासोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील.

3) मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील.

4) रेस्टॉरंटस- सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 04.00 वा. पर्यंत 50 % क्षमतेवर आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा / घेवून जाणेसाठी आणि घरपोहोच सेवा सुरु राहतील.

5) सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग- सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 पर्यंत

6) खाजगी आस्थापना / कार्यालयेसोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत आणि शनिवार व रविवार बंद राहतील.

7) कार्यालयीन उपस्थिती – शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) 50 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.

8)खेळ- मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 05.00 वा. ते सकाळी 09.00 वा. व संध्‍याकाळी 06.00 ते 09.00 वाजे पर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील.

9) सामाजिक/सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम 50 % आसनक्षमतेवर सुरू राहतील.

10) लग्नसमारंभ -जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत (पूर्व परवानगीने)

11) अंत्ययात्रा, अंतविधीला जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थिती.

12) बैठका / निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा50 % क्षमतेसह.

13) बांधकाम- ज्या ठिकाणी कामगारांच्या राहणेची सोय असेल अशी बांधकामे दुपारी 04.00 वाजे पर्यंत सुरु राहतील.

14) कृषि व कृषि पुरक सेवाआठवडयाचे सर्व दिवस दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील.

15) ई कॉमर्स – वस्तू व सेवानियमितपणे पूर्व वेळ (कोविड नियमांचे पालन करुन)

16) जमावबंदी / संचारबंदीसायंकाळी 05.00 ते सकाळी 06.00 वाजे पर्यंत

17) व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स 50% क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वा. ते दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. सदर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पुर्व नियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरु न करणेच्या अटीवर सुरु राहतील. तसेच सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील.

18) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस)50% क्षमतेसह सुरु राहतील (प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.)

19) माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील.

20) खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/ लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवासनियमीत सुरु राहतील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यामध्ये प्रवाशी थांब्यावर उतरणार असलेस त्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल.

21) उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधीत घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमई सह.50 % कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल)

22) उत्पादक घटक –१. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. 2. सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठरविक वेळे शिवाय सुरु करता येत नाहीत.) 3.राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक. ४. डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर/आयटी सर्व्हिसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणार घटक50 % कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल)

23)उत्पादन घटक – इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन घटक जे अत्यावश्यक सेवा, निरंतर प्रक्रिया उद्योग अथवा निर्यात करणारे घटक या मध्ये अंतभूत नसणारे सर्व उत्पादन घटक50 % कर्मचारी क्षमतेसह, जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी सर्व राहणेची ठिकाणी सोय असलेली किंवा कामाच्या ठिकाणा जवळच स्वतंत्र कॉलनी मध्ये राहणारे व ज्यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे असे कर्मचारी, बाहेरुन येणाऱ्या जास्तीत जास्त 50% व्यवस्थापकीय कर्मचारी यांच्यासह राहतील.

सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना

अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा सदर दुकानामधून सेवा घेणाऱ्या व्यक्ती यांना सायंकाळी 5.00 वाजेनंतर हालचाल, प्रवास करण्यास परवानगी असणार नाही. जेव्हा जेव्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता आहे त्यावेळी वाहनात असणाऱ्या सर्व प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही.कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना ही 100 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.

अत्यावश्यक सेवामध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल

1) रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगीक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतुक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत कच्चा माल उद्योग आणि अनुषांगीक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल.

2) शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा / दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर व पेट फुड शॉप.

3) वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज.

4) विमानचलन आणि संबंधीत सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभालदुरुस्ती, कार्गो, ग्राऊंड सर्व्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.)

5) किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटन, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने), संस्था, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लॅस्टीक शिट, ताडपत्री, रेनकोट इ. वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने तसेच दिनांक 15 मे ते 20 मे या कालावधीतील चक्री वादळामुळे तसेच यापुढे येणाऱ्या मान्सुन कालावधी मध्ये घर तसेच इतर बांधकामे यांची दुरुस्ती तसेच सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारी दुकाने.

6) जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी / ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल.

7) शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा. ?

8)सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसेकी, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.

9) विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा.

10) स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे.

11) स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा .

12) रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ संस्था.

13) दुरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी.

14) मालाची / वस्तुंची वाहतुक.

15) पाणीपुरवठा विषयक सेवा.

16) शेती संबंधीत सर्व कामकाज आणि सदर शेती विषयक कामकाज अखंडीत सुरु राहणेसाठी आवश्यक असणारी शेती पुरक सेवा जसे की, बि-बियाणे, खते, उपकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्ती विषयक कामकाज.

17) सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची आयात निर्यात.

18) ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत )

19) मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे.

20) पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा.

21) सर्व प्रकारच्या कार्गो सेवा.

22) डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवाशी संबंधित.

23) शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा.

24( विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा.

25) एटीएम

26) पोस्टल सेवा.

27) बंदरे आणि त्या अनुषांगीक सेवा.

28) कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)

29) अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग.

30) पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तीक व संस्थांसाठी वस्तुचे उत्पादन करणारे घटक सुरु राहतील.

31) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या इतर अत्यावश्यक सेवा.*सुट देण्यात आलेल्या बाबी, आस्थापना पुढीलप्रमाणे आहेत.

a) केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व संविधानीक प्राधिकरणे व संस्था.

b) सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बॅका, सार्वजनिक उपक्रम.

c) अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची सर्व कार्यालये.

d) विमा आणि मेडीक्लेम कार्यालये.

e) औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत.

f) रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया यांचेमार्फत नियंत्रित स्वंतत्र कार्यकक्ष असलेले प्राथमिक वितरक, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि RBI कडून नियंत्रित बाजारामध्ये समाविष्ठ असलेले सर्व आर्थिक बाजार

i) सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळेj) सर्व मायक्रो फायनान्स संस्था

k) मा. न्यायालय, मा. लवाद अथवा चौकशी आयोगाचे कामकाज सुरु असलेस त्यांचेशी संबंधित सर्व अधिवक्ता, वकिल यांची कार्यालये सुरु राहतील.

हा आदेश दि. 7 जून, 2021 पासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील. उपरोक्त प्रमाणे सुट देण्यात आलेल्या बाबी / आस्थापना / नागरिक यांनी शासनाकडून तसेच स्थानिक प्राधिकारणाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले कोविड-19 वर्तणुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्ती, आस्थापना, घटक या कोविड-19 वर्तणुकीचे, शिष्टाचाराचे पालन करणार नाहीत त्या यापुर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार दंडास पात्र राहतील. तसेच सदर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आलेस कोविड-19 विषाणू संसर्ग अधिसूचना अस्तित्वात आहे तो पर्यंत बंद करणेत येईल.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.