भारतात 1 लाख 14 हजार दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद; दोन महिन्यातला नीचांक

सलग 10 व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नोंद झालेल्या नव्या बाधितांची संख्या 2 लाखांहून कमी

नवी दिल्ली,६ जून /प्रतिनिधी:- गेल्या 24 तासात भारतात 1,14,460 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वात कमी नोंद आहे. देशात आता सलग 10 दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या 2 लाखांहून कमी नोंदविण्यात आली आहे. केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या “संपूर्ण सरकार“ या पद्धतीनंतर एकत्रपणे केलेले सहकार्य आणि साततच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत आता सातत्याने घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या 15 लाखांच्या खाली आली आहे आणि आज ती 14,77,799 इतकी आहे. सलग सहाव्या दिवशी ही रुग्णसंख्या 20 लाखांपेक्षा कमी आहे.

गेल्या 24 तासांच्या कालावधीमध्ये सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 77,449 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 5.13 % इतकी आहे.

कोविड 19 च्या संसर्गातून लोक आता बरे होत आहेत, भारतात सलग 24 व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधित रुग्णांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,89,232 इतकी नोंदविण्यात आली हे.

गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्यानं बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या 74,772 ने अधिक होती.

महामारीच्या प्रारंभीच्या काळापासून आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्यांपैकी 2,69,84,781 व्यक्ती कोविड-19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 93.67% झाला आहे, हा दराचा चढता कल दिसून येत आहे.

गेल्या 24 तासांत देशात एकूण 20,36,311 इतक्या चाचण्या झाल्या आहेत आणि भारताने आतापर्यंत एकूण 36.4 कोटी (36,47,46,522) चाचण्या केल्या आहेत.

देशात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविले असताना दुसरीकडे साप्ताहिक पातळीवर पॉझिटिव्हीटी दरातील (बाधित असणाऱ्या रुग्णसंख्येतील) घसरण सुरू असल्याचे दिसत आहे. साप्ताहित पातळीवरील पॉझिटिव्हीटी दर सध्या 6.54 % इतका आहे तर, दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 5.62%  इतका आहे. हा दर सलग 13 व्या दिवशी 10 टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.

दुसऱ्या महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये, देशात देण्यात आलेल्या कोविड –19 लसीच्या मात्रांची एकूण संख्या 23 कोटी पेक्षा अधिक आहे. देशभरातील लसीकरण मोहिमेअंतर्गत 23.13 कोटी लसीकरणाच्या मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 33,53,539  लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.