मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुन घेण्याचे प्रयत्न-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज 

जालना ,१ मे /प्रतिनिधी 

मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुन घेण्याचे प्रयत्न करण्यात येऊन लसीकरण थांबणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असे सांगून तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे जालन्यात ध्वजारोहणानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.केंद्र  सरकारकडून कोरोना संसर्गाची तिसरी लाट येत्या ऑगस्ट महिन्यात अखेर अथवा सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचे स्पष्ट  सांगण्यात आले असून त्याच द्दष्टीकोनातून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्ण तयार करण्यात येत आहे दुसर्‍या लाटेत आपली जी ओढाताण झाली तसे तिसऱ्या लाटेत अजिबात होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन व इतर सर्व औषधोपचार यासह सर्व सरकारी दवाखान्यात डाॅक्टर व इतर आरोग्य कर्मचारीवर्ग पूर्ण दक्ष ठेवण्यात येणार आहे.मात्र या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लोकांनी मास्क बंधनकारक, शारीरिक अंतर व इतर करोना प्रतिबंधात्मक वर्तणूक पाळावी अनावश्यक घराबाहेर पडून फिरू नये असे टोपे यांनी आवाहन केले .

पालकमंत्री श्री टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याप्रसंगीचे मुद्दे.

• राज्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला.

• लस उपलब्धतेचे मोठे आव्हान राज्यासमोर असुन कोव्हीशिल्ड संस्थेने 13 लाख व कोव्हॅक्सनीकडून 3 लाख 57 हजार लसीचे डोस राज्याला देण्याचे मान्य केले आहे.

• प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीचे सत्र राबविण्यात येणार.

• मुंबई, पुणे, नासिक, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांना 20 हजार लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत.

• मध्यम स्वरुपाच्या शहरांना 7 हजार 500 डोस तर छोट्या शहरांना 5 हजार डोस पुरविण्यात आले आहेत.

• पुरवठा करण्यात आलेली लस ही सात दिवस पुरेल अशा पद्धतीने आरोग्य विभागाने नियोजन करण्याच्या सुचना.

• मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुन घेण्याचे प्रयत्न करण्यात येऊन लसीकरण थांबणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

• लस उत्पादन करणाऱ्या सिरम व भारत बायोटेक या कंपन्याकडून जी लस उत्पादन होणार आहे त्याच्या 50 टक्के भारत सरकारला व 50 टक्के लस राज्य सरकार व खासगी व औद्योगिक दवाखान्यांना देण्याचा निर्णय करण्यात आला आहे.

• लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने भारत सरकारच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.

• ब्रेक द चेन अंतर्गत संपुर्ण राज्यात 15 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेलया कडक निर्बंधाचे सर्व नागरिकांनी तंतोतत पालन करुन शासनास व प्रशासनास सहकार्य करावे.

• प्रत्येक व्यक्तीने मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन करावे.

• विनाकारण रस्त्यावर न फिरता आपल्या घरातच राहुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन.