मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी दराच्या तुलनेत अधिक
रुग्ण बरे होण्याच्या सातत्याने वाढत्या दरामुळे कोविड-19 च्या सक्रीय रुग्णांमध्ये घट होण्यास मदत
नवी दिल्ली/मुंबई, 17 जुलै 2020
सध्या भारतात कोविडच्या चाचण्यांचे प्रमाण आणि व्याप्ती वाढल्यामुळे, कोविडच्या रुग्णांची संख्या अधिक दिसत असली तरीही, रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ ही देखील समाधानाची बाब आहे. रुग्ण बरे होत असल्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण बरे होण्याचा दर जूनच्या मध्यापर्यंत 52% इतका होता, तो आता जुलैच्या मध्यापर्यंत 63 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशभरात कोविड-19 च्या सक्रीय रुग्णांची संख्या 3,42,756 इतकी आहे तर आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 6.35 लाख असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 63% झाला आहे.

महाराष्ट्रात, मुंबईत एकूण रुग्णसंख्या लवकरच एक लाखांचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. मात्र, त्याचवेळी हे ही लक्षात घ्यायला हवे की मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दरदेखील सुमारे 70 टक्के इतका म्हणजे, राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा 7 टक्के अधिक आहे आणि एकूण महाराष्ट्रापेक्षा तो 15% अधिक आहे. महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर 55.62% इतका आहे. राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 24,307 इतकी आहे तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 67,830 इतकी आहे.
मुंबईत जूनच्या मध्यापर्यंत रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 50 टक्के इतका होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मिशन झिरो अभियानाची सुरुवात केली, ज्या अंतर्गत, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जलद कृती आराखडा तयार करण्यात आला. एक जुलैपर्यंत हा दर 57 टक्क्यांपर्यंत वाढला आणि आता 15 जुलैपर्यंत हा दर 70 टक्के इतका झाला आहे. आता कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांचे लक्ष्य मुंबईलगतच्या-ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भायंदर या शहरांकडे वळले आहे.
संपूर्ण देशभरात, दिल्लीत एकूण 118,645 रुग्णांच्या तुलनेत, सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 82% इतका आहे. तर राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे.
सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे, ज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण-तपसणी,संपर्क शोधून काढणे, प्रतिबंधक आणि बफर क्षेत्रात सर्वेक्षण, विशिष्ट परिघात केलेली नियंत्रण कामे, व्यापक प्रमाणात चाचण्या आणि वेळेत निदान या सर्व उपाययोजनांमुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीची लवकर ओळख पटणे आणि त्यावर लवकर उपचार होणे शक्य झाले आहे.
कोविड-19 च्या वेगवेगळ्या पातळीवरील, म्हणजे सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळे प्रमाणित प्रोटोकॉल पाळले जात आहेत. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने हे वैद्यकीय उपचार व्यवस्थापन विषयक प्रोटोकॉल निश्चित केले आहेत. या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.लक्षणविरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेल्या 80 टक्के रुग्णांना गृह अलगीकरणात वैद्यकीय देखरेखेखाली राहण्याचा सल्ला दिला जात आहे, ज्यामुळे रुग्णालय यंत्रणांवरचा ताण कमी होतो आहे. तसेचगंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करुन मृत्यू कमी करण्यावर भर दिला जात आहे. हे ही लक्षात घेण्यासारखे आहे, की सध्या उपचारांखाली असलेल्या सक्रीय रूग्णांपैकी, 1.94% पेक्षा कमी रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, 0.35% रुग्ण व्हेंटीलेटर वर आहेत आणि 2.81%रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज आहे.
या सर्व एकत्रित, सामाईक प्रयत्नांमुळे, कोविड-19 च्या रूग्णांसाठीच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा आता मजबूत झाल्या आहेत. सध्या देशात, 1,383 कोविड समर्पित रुग्णालये, 3107 कोविड आरोग्य केंद्र आणि 10,382 कोविड केअर सेन्टर्स आहेत.
देशात 6.35 लाख कोविड-19 रुग्ण बरे
नवी दिल्ली, 17 जुलै 2020
देशात सध्या कोविड-19 रुग्णांची वास्तविक संख्या केवळ 3,42, 756 आहे. 6.35 लाखाहून (63.33%) अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

भारत हा 1.35 अब्ज लोकसंख्येंचा, जगातली सर्वात मोठी लोकसंख्या असलेला दुसरा देश असून इथे दहा लाख लोकसंख्येत 727.4 रुग्ण आढळतात. हे प्रमाण जागतिक स्तरावर काही युरोपियन देशांच्या तुलनेत चार ते आठ पटीने कमी आहे. दहा लाख लोकसंख्येत 18.6 मृत्यू ही भारतातली आकडेवारी जगातल्या सर्वात कमी मृत्यू असलेल्या पैकी आहे. घरोघरी सर्वेक्षण, संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, प्रतिबंधित आणि बफर क्षेत्रात देखरेख, चाचण्या आणि वेळेवर निदान यासाठी सर्व राज्ये आणि केंद्र्शासित प्र्देशाच्या समन्वयी प्रयत्नाने बाधित व्यक्तींचे लवकर निदान झाले. यामुळे उपचारही लवकर सुरु करण्यासाठी मदत झाली.

सौम्य, मध्यमआणि तीव्र अशा वर्गवारीसाठी भारताने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वैद्यकीय व्यवस्थापन सूचनावलीत दिल्याप्रमाणे आदर्श सूचनांचे पालन केले. प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन रणनीतीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. लक्षणे नसणारे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या सुमारे 80 % रुग्णांना गृह विलगीकरणात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. मध्यमआणि गंभीर रुग्णांवर समर्पित कोविड रुग्णालये किंवा समर्पित कोविड आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. लक्षणे नसणारे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्याना गृह विलगीकरणात ठेवल्याने रूग्णालयावरचा ताण कमी राहून गंभीर रुग्णांच्या उपचाराकडे आणि मृत्यू दर कमी राखण्यावर लक्ष केंद्रित करणे सुनिश्चित करता आले. 1.94% पेक्षा कमी रुग्ण आयसीयू मध्ये, 0.35% व्हेंटीलेटरवर,तर 2.81 % रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत.
दाखल झालेल्या रुग्णांना दर्जेदार उपचार सुनिश्चित करण्यासाठी देशभरात वैद्यकीय पायाभूत सुविधांचा सातत्याने विस्तार करण्यात येत आहे. या प्रयत्नामुळे कोविड-19 उपचारासाठी कोविड-19 रुग्णालये पायाभूत सुविधा आज मजबूत आहेत. देशात 1383 समर्पित कोविड रुग्णालये, 3107 समर्पित हेल्थकेअर केंद्रे, 10,382कोविड केअर केंद्रे आहेत. या सर्वांची एकत्रित क्षमता 46,673आयसीयू खाटा इतकी आहे. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातल्या रुग्णालयात 21,848 व्हेंटीलेटर आहेत.एन 95 मास्क आणि पिपिई कीटचा तुटवडा नाही.केंद्राने 235.58लाख एन 95 मास्क आणि 124.26.लाख पीपीई कीट राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थाना पुरवले आहेत.