रेमडेसिविर इंजेक्शनचा  काळा बाजार :दोन मेडीकल चालकांसह घाटीतील कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या 

औरंगाबाद,१६ एप्रिल /प्रतिनिधी

एकीकडे देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे याचा काळा बाजार सुरू असल्याचे उजेडात येत आहे. अशीच घटना औरंगाबादेत सुद्धा घडली असून रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या  दोन मेडीकल चालकांसह घाटी रुग्णालयातील एका चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या  पुंडलिक नगर पोलिसांनी शुक्रवारी (दि.16) सकाळी मुसक्या आवळल्या आहेत.

तिघे आरोपी रेमडेसिविरचा अवैध आणि वाढीव दराने विक्री करित असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून तीन रेमडेसिविर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि दोन मोबाइल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मंदार अनंत भालेराव (29, रा. शिवाजीनगर, बारावी योजना), अभिजीत नामदेव तौर (33, रा. मोती अपार्टमेंट, सहयोगनगर) अशी मेडीकल चालकांची तर अनिल ओमप्रकाश बोहते (40, रा. मोर्य मंगल कार्यालयाजवळ शिवजाीनगर) असे घाटीतील चतुर्थ श्रेणीत काम करणार्या कर्मचार्याचे नाव आहे. आरोपींना रविवारपर्यंत दि.18 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. काळे यांनी दिले.

प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल बजाज (55) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, गुरुवारी दि.15 रोजी पुंडलीक नगर पोेलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जी.बी. सोनवणे यांना माहिती मिळाली की, कोवडी 19 संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन हे सहज उपलब्ध होत नसल्याने आरोपी मंदार भालेराव हा आर्थिक फायद्यासाठी एक इंजेक्शन 14 ते 15 हजारांच्या चढ्या भावाने विक्री करीत  आहे.

पंटरच्या आधारे दिले स्वाक्षऱ्या  केलेले 15 हजार रुपये

पोलिसांनी एका पंटरच्या मदतीने मंदार भालेराव याला संपर्क साधला व त्याच्याकडे इंजेक्शन मागणी केली असता तो इंजेक्शन देण्यासाठी तयार झाला. पोलिसांनी 500 रुपयांच्या तीस नोंटावर पेन्सीलने स्वाक्षऱ्या  केल्या. मंदारला फोन करुन पैसे घेण्यासाठी बोलावले. त्यावर मंदारने पंटरला सुतगिरणी चौकात भेटण्यासाठी बोलावले त्यानुसार पंटर सुतगिरणी चौकात गेला असता मंदारने त्यांच्याकडून स्वाक्षऱ्या केलेले 15 हजार रुपये घेतले व तीस तासात इंजेक्शन तुम्हाणा जेथे म्हटले तेथे आणुन देतो असे सांगितले.

 नेहरु कॉलेज परिसरात केली अटक

सायंकाळी काळी साडे सात वाजेच्या  सुमारास पंटरने फोन करुन आरोपी हा गारखेडा परिसरातील पंडीत जवाहरलाल नेहरुन कॉलेच्या परिसरात इंजेक्शन घेवून येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचाला. रात्री 10.40 वाजेच्या सुमारास आरोपी दुचाकी (क्रं. एमएच—20—सीसी—8668) कॉलेजच्या परिसरात आला. त्याने पंटरला इंजेक्शन देताच पंटरने ठरल्या प्रमाणे इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जागीच पकडले.

 इंजेक्शन विक्रीची चैन आली उघडकीस

आरोपी मंदारची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने शिवजीनगर येथे मयुरेश्र्वर मेडीकल स्टोअर्स असल्याचे सांगितले. तसेच सदरील इंजेक्शन हे अभिजीत तौर याच्या इंद्रा मेडीकल येथून 13 हजार 500 रुपयात खरेदी करुन आणल्याचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आणखी दोन इंजेक्शन हे घाटी रुग्णालयात काम करणारा अनिल बोहते याने विक्रीसाठी दिल्याची कबुली देखील त्याने पोलिसांना दिली. त्यानूसार पोलिसांनी त्याच्याकडून तीन रेमडेसिविर इंजेक्शन, एक दुचाकी आणि मोबाइल जप्त केला. प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 तौर बीडहून आणयाचा इंजेक्शन

मंदारने कबुल केलेल्या गुन्ह्यानूसार पोलिसांनी अभिजीत तौर आणि अनिल बोहते या दोघांना अटक केली. पोलिसांनी तौर कडे चौकशी केली असता, त्याने बीड येथून मीत्राकडून रेमडेसिविर इंजेक्शन आणल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी देखील बीड येथून इंजेक्शन आणल्याचे कबुल केले.

आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडी

आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी दोघा मेडीकल चालक आरोपींकडे आणखी किती इंजेक्शन आहेत याचा तपास करणे आहे. दोघांची मेडीकल स्टोर असल्याने मोठी लिंक असण्याच शक्यता नाकरता येत नाही. अनिल बोहते हा घाटीतील कर्मचारी असून त्याने रुग्णालयातून आणखी किती इंजेक्शन आणले आहेत व त्याला घाटीतून कोणी सहकार्य केले याचा तपास करणे आहे. आरोपींनी पंटर कडून घेतलेले 15 हजार रुपये जप्त करणे आहे. तौर याच्या बीड येथील मीत्राचा शोध घेवून त्याला अटक करणे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.