नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड

नांदेड ,१६ एप्रिल /प्रतिनिधी 

शेतकर्‍यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आज अपेक्षेप्रमाणे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली. 

हरिहरराव भोसीकर

नांदेड जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी कडवे आव्हान उभे केले होते; पण त्यांच्या पदरी निराशा आली. भाजपला 21 पैकी केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले होते. खा. चिखलीकर यांना त्यांच्याच पक्षातील काहींनी विरोध केल्याने अनेक उमेदवार अल्पशा मताने पराभूत झाले. जिल्हा बँकेत काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 व शिवसेनेचा 1 असे 17 संचालक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बँकेवर काँग्रेसेतर लोकप्रतिनिधींची सत्ता आहे. यंदा मात्र बँकेची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याने अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष होते.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर, माजी आ. वसंत चव्हाण व हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यात जोरदार चुरस होती. या तिघांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी केली होती. गुरूवारी रात्री पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेडात दाखल झाले. त्यांनी सर्व संचालकांशी चर्चा केली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी वसंत चव्हाण व उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हरिहरराव भोसीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज दुपारी अध्यक्षपदासाठी वसंत चव्हाण व उपाध्यक्षपदासाठी हरिहरराव भोसीकर यांचे एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संमत जाधव या दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडीनंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना शुभेच्छा देताना बँकेचा कारभार पारदर्शक ठेवावा अशी सूचना केली. जिल्हा बँक वाचवण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी 100 कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. भविष्यात जिल्हा बँकेला वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही केली.