शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली औट्रम घाटाची पाहणी

कन्नड,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अतिवृष्टी व ढगफुटीमुळे औट्रम घाटात दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग २११ (५२) ची वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली औट्रम घाटाची पाहणी करून दुरुस्ती व मदतकार्य  कामाला गती देण्याची सूचना केली.

या पाहणी दरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्ग २११ (५२) येथे कन्नड चाळीसगाव घाटात बोगदा (टनेल) आवश्यक आहे, याचे महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, राष्ट्रीय महामार्गाचे चेयरमन आदींची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे लवकरच या बोगद्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती दिली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष व तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, माजी उपसभापती तथा सरपंच अशोक दाबके, राष्ट्रीय महामार्गाचे महेश पाटील, काळे, चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ठेंगे, नंदकुमार शेजवळ, माजी उपनगर अध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील, उपतालुकाप्रमुख राजू राठोड, विभागप्रमुख सोपान पाटील गोलाईत आदींसह राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम, पोलीस वाहतूक शाखा आणि जिल्हाअधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.