ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट त्रिसुत्री वापरावी-पालकमंत्री सुभाष देसाई

यंत्रणांनी वाढीव उपचार सुविधांसह सज्ज रहावे
नो मास्क नो लाइफ, मास्क वापर अटळ
गंभीर रूग्णांबाबत विशेष खबरदारी घ्यावी

औरंगाबाद,दि.19 –राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून जिल्ह्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांव्दारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

May be an image of 1 person, sitting, standing and indoor

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरंसव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, सर्व यंत्रणा प्रमुख, वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटर व सर्व रूग्णालयांमध्ये अतिरीक्त खाटांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने यंत्रणांव्दारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करून घाटीतील गंभीर रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले.

तसेच गेल्या वर्षभरापासून यशस्वीपणे आपण या संसर्गाचा सामना करत असलो तरी जोपर्यंत जनता सक्रीयपणे शासन प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करणार नाही तोपर्यंत आपण हा वाढता संसर्ग रोखू शकणार नाहीत, याचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी कोविड नियमावलीचे अधिक कटाक्षाने पालन करणे गरजेचे असल्याचे सांगून आता ‘नो मास्क नो लाईफ’ अशा स्थितीपर्यंत परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे मास्क वापरासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन जनतेने केले पाहिजे. यंत्रणांनी संसर्गाला आळा घालण्यासाठी रात्रीची संचारबंदी, 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन या प्रतिबंधात्मक कार्यवाहीसोबत जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन साठा, वाढीव खाटा, औषधांची उपलब्धता या बाबी कटाक्षाने सुव्यवस्थित ठेवाव्यात. कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक रूगणाला व्यवस्थीत उपचार मिळाले पाहीजेत यादृष्टीने सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून प्रभावीरित्या नियोजन ठेवावे. मोठ्या प्रमाणात ट्रेसिंग आणि चाचण्यांचे प्रमाण वाढवत असताना कोरोना लसीकरण मोहीमही व्यापक प्रमाणात राबवावी. याबाबत आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जनजागृतीबाबत आवाहन करणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा, असे सूचित करून जिल्ह्यात ऑक्सीजन, वाढीव प्रमाणात खाटांची उपलब्धता करण्यासाठीचे सर्व यंत्रणांचे नियोजन तसेच रेमडेसीविरची पूरेशी उपलब्धता, चाचण्यांचे वाढीव प्रमाण या बाबी संसर्गात दिलासा देणाऱ्या असून अतिरिक्त व्हेंटीलेटरची जिल्ह्यात उपलब्धता करून देण्यासाठी पाठपुरवा सुरू असून लवकरच ते उपलब्ध होती असे श्री. देसाई यांनी सांगितले.

May be an image of 1 person, sitting, standing and indoor

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढीव कोरोना रुग्णसंख्येच्या प्रमाणात प्रशासन सर्वतोपरी सर्व यंत्रणांच्या मदतीने सज्ज असल्याचे सांगून शहरासह ग्रामीण भागातही चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून ग्रामीण रूग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत असून जिल्ह्यात एकुण 115 उपचार सुविधा उपलब्ध असून 11763 आयसोलेशन बेड, 2124 ओटु बेड तर 532 आयसीयु बेड, तसेच 300 व्हेंटीलेटर असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. लसीकरणासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात तर शहरात 33 ठिकाणी लसीकरणाची सोय केली आहे. तसेच मोबाईल व्हॅनद्वारेदेखील लसिकरणाची सुविधा तयार असल्याचे सांगितले.

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यावेळी म्हणाले, शहरात 10 मार्चपासून मार्शल लॉकडाऊनचा आदेश काढला आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. आजपासून रात्री आठ पासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात येणार आहे. गरजु लोकांना मास्क वाटप सुरू आहे. कठोर उपाययोजना केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे श्री. गुप्ता म्हणाले.महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी केंद्राच्या सूचनेप्रमाणे चाचण्यांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे सांगून चाचण्यासाठी मोबाईल पथके तयार केली आहेत. चाचणीसाठी एकूण 54 पथके तैनात करण्यात आली आहेत. 20 पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणांना कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येईल. लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. प्रत्येक दिवशी दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात असल्याचे श्री. पाण्डेय यांनी सांगितले.

डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागातील रूग्णांना त्याचठिकाणी उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रूग्णालयांमध्ये अत्यावश्यक सुविधांसह पुरेशी व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामीण भागात 8 हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन असून चाचण्यांची क्षमता हजारापर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच ज्या गावांमध्ये 25 पेक्षा जास्त रूगणसंख्या आहे त्या ठिकाणी कन्टेनमेंट झोन तयार करून मोबाईल व्हॅनव्दारा संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे सांगितले.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गेल्या वर्षाप्रमाणे व्युहरचना आखुन तालुका नाकाबंदी करण्यात येत आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, मास्क सॅनिटायझरचे वाटप पोलीसांमार्फत, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुरू असून जनतेला आवाहन करण्यासाठी पोलीसांसोबत स्थानिक यंत्रणा अधिकारऱ्यांनीही रस्त्यावर येऊन जनजागृती करण्याबाबत यंत्रणांना सांगितल्याचे त्या म्हणाल्या.