कन्नड, भगूर, मांजरी शिवारात केली पीक नुकसानीची पाहणी

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद, दिनांक 29 : कन्नड, वैजापूर तालुक्यातील भगूर, गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी राज्यमंत्री सत्तार यांनी केली.गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही यावेळी श्री. सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सर्वांनी प्रयत्नपूर्वक यशस्वी करावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. वैजापूर येथील पंचायत समिती सभागृहात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंमलबजावणी आणि पावसामुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसान याबाबत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून श्री. सत्तार बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रा.रमेश बोरणारे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषद आरोग्य सभापती अविनाश गलांडे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब शिंदे, तहसीलदार निखील धूळधर आदींची उपस्थिती होती.

राज्यमंत्री सत्तार म्हणाले, वैजापूर तालुक्यात सर्व यंत्रणांनी उत्तम कामगिरी पार पडल्याने तालुक्यातील रुग्णांचा बरा होण्याचा दर 89 टक्के आहे. तो अधिक वाढवून वैजापूर तालुका कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कार्य करावे. यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबवावी. लोककलांचा त्यासाठी आधार घ्यावा, असेही त्यांनी सूचवले. त्याचबरोबर आमदार बोरणारे यांनी रुग्णवाहिका तालुक्यास उपलब्ध करून देण्याची मागणी रास्त असून यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.सत्तार म्हणाले. आता झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची सर्व पिके , घरे आदींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना दिलेले आहेत. झालेल्या नुकसानीची भरपाई शासन लवकरच नियमाप्रमाणे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही श्री.सत्तार म्हणाले.

खासदार जलील यांनीही वैजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले, तसेच अडचणी असतील त्या देखील कळवाव्यात, असे आवाहन यंत्रणेला केले. आमदार बोरणारे यांनी तालुक्यासाठी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. तसेच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शेतपिकांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरच तयार करून शासनास सादर करण्यात येईल. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे यावेळी सांगितले. तसेच मास्क वापरण्याबाबत सर्वांनी जागृती करण्याचे आवाहन केले.उपजिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी तालुक्यातील शेतपिकांचे नुकसान, माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती सादर केली. तसेचराज्यमंत्री सत्तार यांनी कन्नड, गंगापूर तहसील कार्यालयात देखील माझे कुटुंब माझी जबाबदारी अंमलबजावणी आणि शेतपिकांचे नुकसान यांची माहिती घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.