वैजापूर तहसील कार्यालयाचे डीएड कॉलेजच्या इमारतीत स्थलांतर ; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन

क्रांती नवरात्र उत्सवालाही जिल्हाधिकारी चव्हाण यांची भेट 

वैजापूर,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तहसील कार्यालयाची जुनी निझामकालीन इमारत मोडकळीस आल्यामुळे ती पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याने येथील शासकीय अध्यापक विद्यालयात तहसील कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते रविवारी (ता.2) फित कापून उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी क्रांती नवरात्र उत्सवास भेट दिली.

याप्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सी.बी.काकड, नायब तहसीलदार महाजन, महेंद्र गिरगे, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, राजेंद्र पाटील साळुंके, डॉ.संतोष गंगवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

तहसीलदार राहुल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आ.बोरणारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची समयोचित भाषणे झाली. उदघाटनानंतर जिल्हाधिकारी यांनी या भागात सुरू असलेल्या क्रांती नवरात्र उत्सवास भेट दिली. क्रांती नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी दिनेश राजपूत, सूर्यकांत सोमवंशी, किरण व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.