रोटेगाव रेल्वेस्टेशन रस्त्यावर भरधाव कारची धडक ; दुचाकीस्वार जागीच ठार

जीवनगंगा वसाहतीजवळ दुर्घटना

वैजापूर, ता.02 जून/ प्रतिनिधी –
शहरातील रोटेगांव स्टेशन रस्त्यावरील जीवनगंगा वसाहतीजवळ वळण घेतांना भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (ता.02) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुरेश चरवंडे (रा.आगरसायगांव) असे या घटनेतील मृताचे नाव आहे. 

सुरेश चरवंडे

या अपघाताविषयीची अधिक माहिती अशी की,  सुरेश चरवंडे हे दुचाकीवर (क्रमांक एमएच २० बीएच ३१२९) नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. जीवनगंगा वसाहतीजवळ वळण घेत असतांना रोटेगावहून वैजापुरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच. ०४ जे.ई.९१३१) त्यांना जोराची धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही धडक एवढी भयंकर होती की दुचाकी जवळपास शंभर फुटी फरफटत गेली व दुचाकीस्वार सुरेश चरवंडे हे हवेत उडत जोराने खाली कोसळले. त्यांना गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी जखमीस तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.