विजेच्या धक्क्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू ; वैजापूर तालुक्यातील बायगाव येथील घटना

वैजापूर, ता.20 जुलै / प्रतिनिधी –
विजेच्या धक्क्याने एका बैलासह दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी बायगाव (तालुका वैजापुर) येथे घडली. या घटनेमुळे बायगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साहेबराव गणपत चेळकर(वय ७०) व  बाबुराव गणपत चोळकर अशी मृतांची नावे आहेत.

बोअरवेलच्या कामासाठी घेतलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेचा अधिक माहिती अशी की. वैजापूर तालुक्यातील मौजे बायगाव येथे चेळेकर वस्तीवर  साहेबराव चेळकर हे एकत्र कुटुंब करून राहतात.  बुधवारी सायंकाळी पाऊस पडल्याने शेतातील कामे उरकून बायगाव देवगाव रंगारी  रस्त्याने बैलगाडीने घराकडे जात होते. त्यावेळी बोरवेलच्या कामासाठी विद्युत खांबाविना घेतलेली विजेची तार बैलांच्या शिंगात अडकल्याने बैल जागीच ठार झाला. तर सोबतच लोखंडी बेलगाडीतही विजेचा प्रवाह उतरल्याने बैलगाडी हाकणाऱ्या साहेबराव चेळेकर यांना जोराचा विजेचा धक्का बसला व ते जागीच गतप्राण झाले.

दरम्यान जोराचा आवाज झाल्याने शेजारी काम करणारे त्यांचे सख्खे भाऊ बाबुराव चेळेकर हे मदतीसाठी धावले. त्यावेळी त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने ते मृत्युमुखी पडले. यावेळी  आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वीज प्रवाह खंडित केला. त्यांनी तातडीने दोघाही भावांना खाजगी वाहनाने देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश अहिरराव वैद्यकीय अधिकारी संदीप भवरे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती देवगाव रंगारी व शिऊर पोलिस ठाण्याला कळवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच  शिऊरचे एपीआय संदीप पाटील,  पोलीस उपनिरीक्षक ए जे नागटिळक. पोलीस कर्मचारी जाधव पवार यांनी देवगाव रंगारी येथील रुग्णालयात येऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान मयत साहेबराव चेळेकर यांच्या पश्चात  पत्नी दोन मुले, दोन मुली. सुना, नातु पणतु असा परिवार आहे. तर मयत बाबुराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी असा परिवार आहे. ते रत्नपुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी. दादाराव चेळेकर व औरंगाबाद येथे पोलिस खात्यात कार्यरत असलेले. गोकुळ चेळेकर यांचे वडील होत.