लासुरगाव येथे देशी दारूचे पाच बॉक्ससह एकास पकडले ; वैजापूर पोलिसांची कारवाई

वैजापूर, ३ डिसेंबर  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसमोरुन विना नंबरच्या मोपेडवरून देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यास वैजापूर पोलिसांनी  मुद्देमालासह पकडले. शनिवारी (ता.03) सकाळी ही कारवाई करण्यात आली.

लासुरगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळे समोरून एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिव्हा मोपेडवर देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली त्यावरून वैजापूर पोलिस  ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज पाटील व बीट अंमलदार मोईस बेग यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास शाळेसमोरुन विना नंबरच्या ऍक्टिव्हा मोपेडवरून जाणाऱ्या दीपक सुभाष गोटे (22 वर्ष,रा. शिरेगांव ता.गंगापूर) याची चौकशी केली असता त्याच्याजवळ भिंगरी नावाच्या देशी दारूचे पाच बॉक्स आढळून आले. 16 हजार 800 रुपये किंमतीची देशी दारू व 25 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची जुनी ऍक्टिव्हा मोपेंड असा एकूण 41 हजार 800 रुपयांच्या मुद्देमालासह दीपक गोटे यांनी ताब्यात घेतले.

उपविभागीय पोलिस  अधिकारी महक स्वामी व पोलिस  निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस  उपनिरीक्षक मनोज पाटील व बीट अंमलदार मोईस बेग यांनी ही कारवाई केली.