आदर्श डेअरीशी फसवेगिरी करणे पडले महागात

किराणा दुकान चालक रामेश्‍वर होलेला चार महिन्‍यांचा कारवास; दहा हजार रुपयांचा दंड

औरंगाबाद ,१ जून /प्रतिनिधी :-आदर्श डेअरी प्रॉडक्टस प्रा.लि. कडून एक लाख ७१ हजार ९१ रुपये किंमतीचे दुध खरेदी करुन बँकेच्‍या बंद खात्‍याचा धनादेश देवून आदर्श डेअरी प्रॉडक्‍टस प्रा.लि. शी फसवेगिरी करणे ईश्‍वर किराणा आणि जनरल स्‍टेअर्सचा मालक रामेश्‍वर बापुराव होले याला चांगलेच माहागात पडले.

धनादेश अनादर प्रकरणी प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी आरोपी रामेश्‍वर होले चार महिन्‍यांचा कारवास आणि दहा हजारांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली. बरोबरच आदर्श डेअरीचे एक लाख ७१ हजार ०९१ रुपये एका महिन्‍याच्‍या आत परत करण्‍याचे आदेश दिले. तसे न केल्यास अतिरिक्त १५ दिवसांच्‍या कारावासाची‍ शिक्षा होले याला भोगावी लागणार आहे.

प्रकरणात आदर्श डेअरी प्रा.लि. चे संचालक अनिल अंबादास मानकापे पाटील यांनी अॅड. एस.बी. रक्षाळे यांच्‍या मार्फत न्‍यायालयात तक्रार दिली होती. त्‍यानूसार, मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात आरोपी रामेश्‍वर होले याचे ईश्‍वर किराणा आणि जनरल स्‍टोअर्स नावाचे दुकान आहे. आरोपी हा आदर्श डेअरी प्रॉडक्टस प्रा.लि. चा ग्राहक असून तो सन २०१६ पासून डेअरीकडून उधारीवर दुध खरेदी करित होता. यासंबंधीचे डेअरीकडे आरोपीचे उधारी खाते होते, उधारी खात्‍याप्रमाणे आरोपीकडून जानेवारी २०१८ पर्यंत एक लाख ७७ हजार ५९१ रुपये येणे बाकी आहे. या रकमेच्‍या परतफेडी करिता आरोपीने २ फेब्रुवारी २०१८ रोजी टी.जे.एस.बी बँकेचा एक लाख ७१ हजार ९१ रुपयांचा धनादेश आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत वटण्‍यासाठी दिला. मात्र बँकेने अकाउंट क्लोजड असा शेरा मारुन तो धनादशे न वटता परत आला. त्‍यामुळे आदर्श डेअरी मार्फत आरोपीला नोटीस पाठविण्‍यात आली. मात्र नोटीस मिळुनही आरोपीने धनादेशातील विहीत रक्कम फिर्यादीला दिली नाही. त्‍यामुळे तक्रार दाखल करण्‍याता आली.