कोविड सेंटरमधील रुग्णांना निकृष्ट भोजन,औरंगाबाद महापालिकेला नोटीस

औरंगाबाद :
शहरातील कोविड सेंटरमधील रुग्णांना निकृष्ट भोजन मिळत असून सोयी-सुविधांचा अभाव असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणात न्या. संजय. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेला नोटीस बजावली. याचिकेवर १० ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल.

सामाजिक कार्यकर्ते मेराज अहमद अन्सारी यांनी सदर याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. एस. एस. काझी यांनी त्यांची बाजू मांडली. याचिकेत म्हटल्यानुसार, याचिकाकर्त्याने शहरातील विद्यापीठ, किल्लेअर्क, नौखंडा, एमआयटी परिसरातील कोविड सेंटरला भेट दिली. येथील काही रुग्णांचे शपथपत्रही याचिकेसोबत जोडण्यात आले आहे.  एका वकिलाला विद्यापीठ परिसरातील सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानुसार, त्याला २२ ते २६ जूनदरम्यान क्वारंटाईन करण्यात आले होते. २३ जून रोजी त्याला दुपारचे जेवण चार वाजता तर रात्रीचे जेवण ११:३० वाजता मिळाले. येथील भोजनही निकृष्ट दर्जाचे होते. या सेंटरमध्ये त्याचासोबत १७० च्या आसापास रुग्ण होते. या सर्वांना पिण्याचा पाण्यासाठी एक जार आणि एकच ग्लास देण्यात आला होता. तसेच याचिकेसोबत इतर रुग्णांनीही शपथपत्राद्वारे सादर केले. कोविड सेंटरमधील बेडशीट, उश्यांची खोळही बदलली जात नाही, मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना वेळेत पोषक आणि योग्य प्रमाणात नाष्टा, भोजन मिळावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *