विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

कोरोना प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित 

औरंगाबाद,दि.10 :- कोविड-19 विषाणु प्रतिबंधात्मक लस पूर्णत: सुरक्षित असून कोरोना आजारापासून स्वत:बरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वत: लस टोचून घेतल्यानंतर केले.

May be an image of 1 person, standing and indoor

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे नोंदणी करुन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कमलाकर मुदखेडकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी डॉ.विजया सोनवणे व इतर आरोग्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  

May be an image of 1 person and text that says '福 NHM मी कोविडची लस घेतली आहे! प्रत्येकवेळी विजय दरवेळी त्येक वेळी जय दरवेळी SARS- Cor Vac SARS. Vacc लस पुर्णपणे सुरक्षित आहे जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद.'

लस टोचून घेतल्यानंतर श्री.केंद्रेकर म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असल्याने मी स्वत: लस टोचून घेतली आहे. ही लस टोचून घेणे हे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे. आरोग्य क्षेत्रात फ्रंटलाईनवर काम करणाऱे आरोग्य अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, इतर सर्व शासकीय अधिकारी – कर्मचारी ज्यांची नोंदणी झाली आहे, त्यांनी जरूर लस टोचून घ्यावी.

कोणत्याही लसीकरणाबाबत सुरुवातीला जनमाणसात संभ्रम असतो. कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतही काही नागरिकांत समज-गैरसमज असणे गैर नाही यासाठीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी मी स्वत: लस घेतली आहे, तेंव्हा सर्वांनी कारोना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी, असेही श्री.केंद्रेकर यांनी सांगितले.

May be an image of 1 person, sitting and standing

लसीसाठी नोंदणी केलेल्या आरोग्य सेवक, शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर सामान्य जनतेला लस उपलब्ध करुन दिली जाईल. त्यात प्रथम ज्येष्ठ नागरिक व ज्यांना अत्यंत आवश्यकता आहे त्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जाईल. ही लस सुरक्षित व सर्वांच्या हिताची आहे, हे जसे जसे जनतेला कळेल तसे सर्व जनता ही लस स्वत: टोचून घेतील, असा विश्वासही श्री.केंद्रेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी श्री.केंद्रेकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याबाबतच्या व्यवस्थेची पाहणी केली.