वैजापूर तालुक्यात समृद्धीच्या अवजड वाहनांमुळे खराब झालेले रस्ते बनवून द्या अन्यथा आंदोलन शहर भाजपचा इशारा

वैजापूर ,२० जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात समृध्दी महामार्गाचे काम सुरू असून  कामासाठी लागत असलेल्या गौण खनिजांची अवजड वाहनातून मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वैजापूर शहर व ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असून हे रस्ते बनवून देण्यात यावे अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहर भाजपच्यावतीने  देण्यात आला. 

यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व एल अँड टी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवजड वाहतुकीमुळे खेड्यापाड्यापासून शहरातील प्रामुख्याने म्हस्की,लाडगांव व  खंबाळा फाटा या रस्त्यांची अतिशय दयनीय व बिकट अवस्था झाली आहे. समृध्दी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी एल अँड टी ने सदरील रस्ते पूर्णपणे व अतिशय व्यवस्थितपणे बनवून देणे बंधनकारक आहे.  भाजपचे जिल्हा सरचिटणीस  दिनेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपचे अध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, गणेश खैरे, गोकुळ भुजबळ, राजेश गायकवाड, प्रशांत कंगले, ज्ञानेश्वर इंगळे,भाजप व्यापारी आघाडीचे निलेश पारख, शैलेश पोंदे, महेश हिरण, गिरीश चापानेरकर, सन्मितसिंग खनिजो, गौरव दोडे, संदीप पवार, सोमू सोमवंशी, महेंद्र काटकर, मंगेश मते, धनंजय अभंग, अमोल गोरक्ष, प्रदीप चव्हाण, हामीद जिलानी, रुद्रा शेजवळ, सूरज राजपूत, सचिन दाढ़े, दीपक पवार, नदीम शेख, ज्ञानेश्वर शिरसाट आदी पदाधिकाऱ्यांनी  उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड व एल अँड टीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना निवेदन दिले. येत्या 26 जानेवारी 2022 पर्यंत सदरील रस्त्यांचे काम सुरू करावे अन्यथा उग्र  आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर झालेल्या नुकसानीची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित ठेकेदार व प्रशासनाची असेल असा इशारा देण्यात आला आहे.