चरसची विक्री करणाऱ्यास आणि ओढणारे चौघे अटकेत

औरंगाबाद गुन्‍हे शाखेच्‍या पथकाची कारवाई ,एका आरोपीला पोलिस कोठडी  

औरंगाबाद, २५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- चरसची विक्री करणाऱ्यास  आणि चरस ओढणाऱ्या  चौघांना अशा पाच जणांना गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने रविवारी दि.२४ सायंकाळी सिडको येथील मोकळ्या मैदानात छापा मारुन अटक केली. चरसची विक्री करणाऱ्याकडून ५० हजार ५०० रुपयाची १०१ ग्रॅम चरस जप्‍त करण्‍यात आली आहे.

सय्यद नजिरोद्दीन सय्यद रियाजउद्दीन (२९, रा. कटकट गेट, माशा अल्ला हॉल जवळ) असे चरसची विक्री करणाऱ्याचे नाव आहे. तर साजीद अब्दुल करीम अन्वर (३८, रा. सदफ कॉलनी, कटकट गेट), सोहेल खान शकील खान (३३, रा. मजनुहील रशिदपुरा), नाथन प्रभाकर पाटील (३१, रा. इसीएस हॉस्‍पीटल क्वॉर्टर, चिकलठाणा) आणि शेख जफर नुर मोहमंद (३७, रा; बरजंगचौक, सिडको) अशी चरस ओढणाऱ्याची नावे आहेत.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपी सय्यद नजिरोद्दीन याला २७ ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत तर उर्वरित चौघा आरोपींची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी दिले.

या प्रकरणात गुन्‍हे शाखेचे जमादार गुलाब पुरा चव्‍हाण (५२) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, २४ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्‍या सुमारास सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांना माहिती मिळाली की, माशा अल्ला फंक्शन हॉल जवळील एका मैदानात तरुण चरसची पाच हजार रुपये तोळ्या प्रमाणे विक्री करत आहे. माहिती आधारे शिंदे यांच्‍या पथकाने सदर मैदानावर छापा टाकून चरस विक्री करणाऱ्यासह चरस ओढणाऱ्या  अशा पाच जणांना अटक केली.

अंगझडतीत आरोपी सय्यद नजिरोद्दीन याच्‍या ताब्यातून ५० हजार ५०० रुपयांची १०१ ग्रॅम चरस, वजन काटा, सुती कापडाच्‍या चिंध्‍या, चाकु व लाकडी ओंडका जप्‍त करण्‍यात आला. तर उर्वरित साजीद अब्दुल याच्‍या ताब्यातून मोबाइल, चिलीम, सोहेल खान याच्‍या ताब्यातून आयफोन, लायटर व चरस ठेवण्‍यासाठी छोट्या पॉलेथीन बॅग, नाथन पाटील याच्‍या ताब्यातून आयफोन, चिलीम व काडेपेटी आणि आरोपी शेख जफर याच्‍या ताब्यातून एक मोबाइल चिलीम आणि छोट्या पॉलेथीन बॅग असा सुमारे दोन लाख ३ हजार रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्‍त केला.

पोलिसांनी सय्यद नजिरोद्दीन याची चौकशी केली असता, सदरील चरस त्‍याने नसिर खान बशीर खान (रा. अलमगीर कॉलनी) आणि अल्ताफ खान (रा. रशिदपुरा, मजनुहिल) यांच्‍याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी चरस विक्री करणाऱ्या  आरोपीने चरस कोठुन आणली व त्‍याचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालाकडे केली.