हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण

ऑनलाईन स्वरुपातून होणार प्रसारण

औरंगाबाद,१६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद  मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उद्या (ता. 17) सकाळी नऊला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्यानात सकाळी 8.45 मिनिटांनी आगमन होणार असून सकाळी 8.45 ते  नऊ या वेळेत स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यात येईल. यानंतर नऊला ध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री नागरिकांना संबोधित करतील व त्यानंतर ते निमंत्रितांना भेटणार आहेत.

          कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हैदराबाद मुक्ती संग्राम दिन नागरिकांना घरून अनुभवता यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/AurangabadDIO या फेसबुक पेजवर, तसेच MCN या स्थानिक वाहिनीच्या (चॅनल क्र.122 व 523 (एचडी)) व युट्यूबवर MCN NEWS चॅनेलवरुन थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रितांनी कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत राष्ट्रीय पोषाखात कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा परिषद इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन

औरंगाबाद :  हैदराबाद  मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्या (ता. 17) सकाळी 9.25 मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

विशेष निमंत्रित म्हणून खासदार सय्यद इम्त‍ियाज जलिल, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संजय श‍िरसाठ, प्रशांत बंब, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आहेत.या कार्यक्रमास निमंत्रितांनाच प्रवेश असल्याने निमंत्रितांनी कार्यक्रम सुरू होण्याअगोदर 30 मिनिटे स्थानापन्न व्हावे. निमंत्रितांनी कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कटाक्षाने पालन करावे. तसेच कार्यक्रमस्थळी उपलब्ध केलेल्या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, मुख्‍य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, सभापती किशोर बलांडे, अविनाश गलांडे, अनुराधा चव्हाण, मोनालीताई राठोड, सर्व जिल्हा परिषद सदस्य आदींनी केले आहे.