सातवा माहेरचा आहेर सन्मान ​सरदार जाधव​ यांना ​ ​प्रदान

औरंगाबाद ,१९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- उंडणगाव मित्र मंडळाच्या वतीने औरंगाबादचे भुमीपुत्र असणार्‍या कलावंत, लेखक, गायक, नट, नाटककार आदिंना हा सन्मान समारंभ पुर्वक प्रदान करण्यात येतो. सातवा माहेरचा आहेर सन्मान साहित्यिक व चित्रकार सरदार जाधव​ यांना सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते समारंभ पुर्वक प्रदान करण्यात आल्या.

सरदार जाधव यांनी आपल्या जडण घडणीत उंडणगावचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. आपल्यावर आपल्या लिखाणावर या गावाने इथल्या माणसांनी निरातिशय प्रेम केल्याचा आवर्जून उल्लेख केला. जुन्या आठवणी सांगितल्या.सरदार जाधव यांचे वाङ्मयीन व्यक्तीमत्व उलगडून दाखवताना इंद्रजीत भालेराव यांनी अतिशय समर्पक भाषण केले. विद्यार्थी दशेतल्या सरदार यांच्या घडणीच्या ह्रद्य आठवणी सांगितल्या. 

सत्कार समारंभानंतर मराठी कवितांचा कार्यक्रम ‘रसयात्रा’ सादर करण्यात आला. इंद्रजीत भालेराव, दासु वैद्य, रविशंकर झिंगरे, श्रीकांत उमरीकर, विश्वनाथ दाशरथे यांनी रसाळ नामदेव ते ढसाळ नामदेव असा मराठी कवितेचा प्रवास सुरेख उलगडला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद महाजन यांनी तर आभार आर्कीटेक्ट अनिरूद्ध नाईक यांनी मांडले. पाहुण्यांचे स्वागत डाॅ. राजेंद्र धनवई, विजय नाईक यांनी केले.विश्वनाथ दाशरथे यांच्या गायनाने समारंभाचा समारोप झाला.

कार्यक्रमाला उंडणगावकरांसोबतच शहरातील रसिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोना आपत्तीत रितसर परवानगी घेवुन काळजी घेवुन प्रत्यक्ष कार्यक्रम साजरा होतो आहे याचे समाधान रसिकांनी व्यक्त केले.दरवर्षी उंडणगाव मित्र मंडळ औरंगाबाद शहरात हा सोहळा घेणार असल्याची माहिती मुख्य संयोजक विजय नाईक यांनी दिली.