औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत केंद्राकडून अमृत दोन साठी निधी मिळवून देणार : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहराची तहान  भागविणाऱ्या  नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्राकडे प्रस्ताव दाखल केल्यास केंद्राकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज सोमवारी दिले.

औरंगाबाद शहर नवीन पाणीपुरवठा प्रकल्प आढावा बैठक आज सोमवारी दिनांक 06 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार (पूर्व) अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी १६८० कोटी रुपयांच्या योजनेची माहिती दिली. सध्या शहराला 120 एम एल डी पाणी मिळत आहे. या योजनेअंतर्गत शहराची लोकसंख्या २०५२पर्यंत ३३.१७ लाख गृहीत धरून प्रतिदिन दरडोई 135 लिटर पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय जे सिंग यांनी पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण करून पाणी पुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाथसागरापासून ते शहरापर्यंत होणाऱ्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांची माहिती घेतल्यानंतर या योजनेसाठी केंद्र सरकारकडून जी काही मदत लागले.यासाठी प्राधान्याने देईल. मी या शहराचा महापौर राहिलो आहे.पाणी प्रश्नांची चांगली माहिती आहे.शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची असून शहराचा प्राण आहे.त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल.केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी संबंधित मंत्र्यांशी बोलून परवानगी मिळवून देईल तसेच अमृत दोन टप्प्यांसाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा‌ त्यासाठी निधी मिळवून देतो असे आश्वासन देऊन पाणी पुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण करा असे निर्देश दिले.

अमृत 2 योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळाला तर केंद्र सरकारकडून 50 टक्के, राज्यशासन 25 टक्के व महानगरपालिकेकडून 25% हिस्सा टाकावा लागणार आहे.सदर योजना महाराष्ट्र शासनच्या नगरोथ्यान योजनेअंतर्गत १६८०.५० कोटी रुपयांची शहराची नवीन पाणीपुरवठा योजना आहे.शासकीय अनुदान ११७६.३५ कोटी, महानगरपालिका पालिकेचा हिस्सा ५०४.१५ कोटी रुपये आहे. या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर एस लोलापोळ, मनपाचे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा किरण धांडे, उप अभियंता के.एम. फालक, कनिष्ठ अभियंता एम .एम .बाविस्कर आदी उपस्थित होते.