महाराष्ट्रातील स्टार्टअप्स करिता मॅजिकतर्फे इनक्युबेशन प्रोग्रॅमचे आयोजन

औरंगाबाद,२३ जुलै /प्रतिनिधी :-मराठवाडा एक्सीलरेटर फॉर ग्रोथ अँड इनक्युबेशन कौन्सिल (MAGIC) या संस्थेतर्फे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या रेडी इंजिनिअर प्रोग्रॅम अंतर्गत रेडी इंजिनिअर – मॅजिक स्टार्टअप्स (REMS) या इनक्युबेशन प्रोग्रामची घोषणा करण्यात आली आहे.  हा उपक्रम, नवोदित उद्योजकांना आणि महाराष्ट्रातील टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील विद्यार्थी स्टार्टअप्सना त्यांची कल्पना व्यावसायिक आणि व्यवहार्य उत्पादने/सेवांमध्ये रुपांतरीत करण्याकरिता राज्य पातळीवर असे अनोखे उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येणार असल्याची माहिती मॅजिकतर्फे देण्यात आली आहे. मॅजिक ही मराठवाड्यातील अग्रणी औद्योगिक संस्था असलेल्या सीएमआयएच्या पुढाकाराने स्थापित आणि, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि एमएसएमई मंत्रालय, नवी दिल्ली मान्यता प्राप्त असलेली संस्था देशातील स्टार्टअप्स इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी कार्यरत आहे.

सात महिने कालावधीसाठी असणारा रेडी इंजिनीअर – मॅजिक स्टार्टअप्स (आरईएमएस) उपक्रमात  निवडण्यात आलेल्या स्टार्टअप्सना प्रत्येकी 1.05 लाखापर्यंत सीड फंडिंग मदत केली जाणार आहे, तसेच मॅजिकतर्फे वैयक्तिक मार्गदर्शन, मेंटोरिंग करण्यात येणार आहे. या स्टार्टअप्सना मॅजिक संस्थेच्या कार्यालयात को-वर्किंग जागा (Co-working Space) आणि त्यांच्या उत्पादनाच्या प्रचारासाठी इकोसिस्टीममध्ये नेटवर्किंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच बरोबर स्टार्टअप्स इकोसिस्टीम करिता आयोजित टीएमआयएच (टाटा टेक्नॉलॉजीज मॅजिक इनोव्हेशन हब) या भारतातील पहिल्या व्हर्च्युअल प्रदर्शनात स्वतंत्र बूथ मोफत देण्यात येणार आहे.

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती सांगताना मॅजिकचे संचालक प्रशांत देशपांडे म्हणाले,  रेडी इंजिनीअर – मॅजिक स्टार्टअप्स (आरईएमएस) उपक्रमाचा कालावधी हा ७ महिन्यांचा कार्यक्रम असून या उपक्रमाकरिता निवडण्यात आलेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि त्यांची उत्पादन / सेवा विकसित करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवउद्योजकांनी http://bit.ly/REMStartups या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२२ आहे. अधिक माहितीसाठी [email protected] या ई-मेल वर संपर्क साधू शकता, अशी माहिती मॅजिकच्या वतीने देण्यात आली आहे.