भालेराव पुरस्कार व पुस्तक प्रकाशन कार्यक्रम 14 रोजी ! यंदा डॉ.आनंद नाडकर्णी यांचा सन्मान

औरंगाबाद,७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ, विविध विषयांवरील लेखक-कार्यकर्ते डॉ.आनंद नाडकर्णी यांना अनंत भालेराव पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण आणि भालेराव यांच्यावरील ‘कैवल्यज्ञानी’ या स्मरणग्रंथाचे प्रकाशन असा संयुक्‍त कार्यक्रम येत्या रविवारी (दि.14) येथे होत आहे.

झुंजार स्वातंत्र्यसैनिक व ध्येयवादी संपादक अनंत भालेराव यांची स्मृती वरील पुरस्काराच्या माध्यमातून जागविली जाते. गेल्या 30 वर्षांत साहित्य, पत्रकारिता, संगीत-नाट्य आणि समाजकार्य या क्षेत्रांतील दिग्गजांना पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर वैद्यक व्यवसायासह अनेक क्षेत्रांत भरीव कार्य करणार्‍या डॉ.आनंद नाडकर्णी यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झाली. रोख रक्कम, मानपत्र व ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरूप असून भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार्‍या या कार्यक्रमातच कैवल्यज्ञानी (संपादक – प्रवीण बर्दापूरकर) या अनंत भालेराव स्मरणग्रंथाचे प्रकाशन डॉ.नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ग्रंथात 25 लेखांचा समावेश असून भालेराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वस्पर्शी वेध घेण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर प्रतिष्ठानचा व्यापक कार्यक्रम होत असून निमंत्रित तसेच भालेराव यांच्या चाहत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ.सविता पानट आणि संजीव कुळकर्णी यांनी केले आहे.