आरोग्य विभागाच्या पदभरतीतील गैरप्रकारांबाबत सोमवारी अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मुंबई, दि. 2 :- सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रिक्त पदे भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात काही आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यासंदर्भात सोमवारी योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली.

काही काळ्या यादीतील कंपन्यांना परीक्षेची जबाबदारी देण्यात आली असल्यास अशा बाबी तपासून बघितल्या जातील व त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 11 ठिकाणी छापे टाकले असून 42 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानपरिषद सदस्य रामदास कदम, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. 2 :- कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य गिरीशचन्द्र व्यास यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण 27 हजार 502  पदांचा आकृतीबंध मंजूर असून त्यापैकी 18 हजार 622 पदे भरलेली आहेत तर 8 हजार 880 पदे रिक्त आहेत. यामधील तांत्रिक संवर्गाची 20  हजार 181 पदे मंजूर असून त्यापैकी 14 हजार 809 पदे भरलेली आहेत तर 5  हजार 372 पदे रिक्त आहेत. 16 मे 2018 शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील 100 टक्के  पद भरतीस मान्यता देण्यात आली होती.त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर वित्त विभागाच्या 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत, अशीही माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे  व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.विधानपरिषद सदस्य गिरीशचन्द्र व्यास, नागोराव गाणार आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे

राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 217 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेडनेट, मल्चिंग, कांदा चाळ उभारणी अशी कामे करण्यात येत आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता 111 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 42 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेसाठी 2 कोटी 17 लाख रुपये वितरित करण्यात आले असून 5 कोटी 41 लाख रुपये खर्चाची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली.

कोकणातील चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने 609 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. कोरोना संकटाच्या काळातही शासनाने फळबाग लागवडीचे काम सुरूच ठेवले असून येत्या वर्षभरात 50 हजार हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहितीही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई दि.2 : -राज्यात अवैध रेती उत्खनन प्रतिबंध करण्यासाठी तहसील व उपविभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली असून या पथकामार्फत मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील अवैध रेती उत्खनन रोखण्याबाबत विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असून त्याबाबत महसूलमंत्री, गृहमंत्री व विरोधी पक्षनेते यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करणार असल्याचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी सांगितले.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य शशिकांत शिंदे, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.