औरंगाबाद जिल्हा रोजगार निर्मितीतील ‘मॉडेल जिल्हा’ व्हावा – रोहयो मंत्री संदिपान भूमरे

May be an image of 4 people, people standing and people sitting

औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका) : रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून औरंगाबाद जिल्हा रोजगार निर्मितीतील मॉडेल तयार करण्याच्यादृष्टीने प्रत्येक गावात महिनानिहाय नियोजन करून रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी आज दिल्या.

         औरंगाबाद पंचायत समिती कार्यालयात मग्रारोहयो नियोजन व आढावा बैठक मंत्री श्री. भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, जिल्हा परिषदेच्या सभापती छाया घोगरे, उपसभापती श्रीमती पडूळ, बांधकाम सभापती विलासबापू भूमरे, रामूकाका शेळके, जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, प्रकाश चांगूलपाये, अक्षय जायभाये, पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे, विजय जाधव, श्री. भालेराव, श्री. भोसले, खासगी सचिव अशोक शिरसे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, तहसीलदार शंकर लाड, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, ग्रामसेवक, सरपंच आदींची उपस्थिती होती. 

          मंत्री भूमरे म्हणाले, मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या कामांपैकी काही कामे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात करता येऊ शकतात. त्यानुसार नियोजन करून वर्षभरात जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत कमीत कमी दोन सार्वजनिक कामे सुरू करावेत. तसेच किमान पाच वैयक्तिक लाभाची कामे सुरू राहिली पाहिजेत, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची दखल घेण्यात येऊन. शासन त्यांच्या पाठिशी आहे. तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले. तसेच ग्रामसेवक, कृषी सहायकांनी मनरेगाअंतर्गतच्या कामांना प्राधान्य देऊन अधिकाधिक कामे करण्यावर भर देऊन मोठ्याप्रमाणात कामे करावीत. प्रत्येक ग्रामपंचायतींनीही यात पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही श्री. भूमरे यांनी यावेळी केल्या.

या बैठकीस जिल्हा परिषद गट आडगाव बु. पिंप्री राजा, गोलटगाव, करमाडमधील ग्रामस्थ, पदाधिकारी, जिल्हा गटातील सदस्य, पंचायत समिती गटातील सदस्यांचीही उपस्थिती होती.